मुंबई, दि. ८ : परिशिष्ट-२ नंतर अपात्र झोपडीचे हस्तांतरण झाल्यामुळे अभय योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या २००० पूर्वीच्या तसेच २००० ते २०११ दरम्यानच्या झोपडीधारकांनाही अभय योजनेचा लाभ देण्यासाठी योजनेचा विस्तार करण्याचे निर्देश पालकमंत्री, मुंबई उपनगर तथा इलेक्ट्रॉनिक्स,माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.
२०११ पूर्वी परिशिष्ट-२ तयार झालेल्या मात्र रखडलेल्या पुनर्वसन योजनांमधील पात्र झोपडीधारकांना सध्या अभय योजनेचा लाभ मिळत आहे. तथापि, परिशिष्ट-२ मध्ये अपात्र ठरलेले आणि त्यानंतरच्या नियमांनुसार पात्र ठरू शकणारे झोपडीधारक तसेच परिशिष्ट-२ नंतर झोपडीचे हस्तांतरण झाल्यामुळे अभय योजनेपासून वंचित राहिलेले झोपडीधारक या योजनेच्या लाभापासून दूर आहेत.
या पार्श्वभूमीवर, २००० ते २०११ या कालावधीतील सशुल्क पात्र-अपात्र झोपडीधारकांचाही अभय योजनेत समावेश करून त्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.
या निर्णयामुळे मुंबईतील सुमारे २५ हजार वंचित झोपडीधारकांना अभय योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्याचबरोबर रखडलेल्या पुनर्वसन योजनांना गती मिळून या झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
झोपडीधारकांना पुनर्वसनाचा लाभ देताना पात्रता, हस्तांतरण आणि परिशिष्ट-२शी संबंधित प्रलंबित बाबींचा नियमानुसार विचार करून योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रस्ताव व कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचनाही मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिल्या.
0000
संजय ओरके/विसंअ