• Wed. Sep 9th, 2026

Ganeshotsav Toll Free : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! राज्य सरकारकडून टोलमाफीची घोषणा, स्वतंत्र पासची व्यवस्था

येत्या गणेशोत्सवात कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. राज्य सरकारने गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी टोलमाफीची घोषणा केली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याबाबत माहिती दिली आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदा शासनाकडून मोठा दिलासा मिळणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना पथकरातून (टोल) सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. ११ सप्टेंबर २०२६ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मुंबई–बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८, मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील कोकणाकडे जाणाऱ्या संबंधित मार्गांवरील टोल नाक्यांवर ही टोलमाफी लागू राहणार आहे. याशिवाय नगरविकास विभागाच्या अखत्यारीतील अटल बिहारी वाजपेयी शिवडी–न्हावा शेवा अटल सेतूमार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांनाही टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि राज्यातील इतर शहरांमध्ये वास्तव्यास असलेले हजारो कुटुंबीय गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी कोकणात जात असतात. या काळात मुंबई–गोवा महामार्गासह कोकणाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढते. गणेशभक्तांचा हा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि आनंददायी व्हावा, तसेच त्यांना प्रवासादरम्यान अनावश्यक आर्थिक भार सहन करावा लागू नये, यासाठी शासनाने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परिपत्रक जारी

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत ८ सप्टेंबर २०२६ रोजी शासन परिपत्रक जारी केले आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासह पोलीस, वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने परस्पर समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Maharashtra TimesUday Samant : आरक्षण देणाऱ्यांवरच आक्षेपार्ह शब्दप्रयोग नको, मंत्री उदय सामंतांचे जरांगे पाटलांना आवाहन

टोलमाफीसाठी पास दिले जाणार

गणेशभक्तांना टोलमाफीचा लाभ घेताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी ‘गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्वतंत्र स्टिकर किंवा पास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या पासवर संबंधित वाहनाचा क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद केले जाणार आहे. परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, पोलीस विभाग आणि संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या समन्वयातून आवश्यक त्या ठिकाणी हे पास उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

कुठे मिळणार टोलमाफीचे पास?

पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या तसेच आरटीओ कार्यालयांमध्येही पास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सदर पास परतीच्या प्रवासासाठीदेखील ग्राह्य धरला जाणार असल्याने कोकणातून परतताना गणेशभक्तांना पुन्हा टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.

Maharashtra TimesNarendra Bhondekar : महायुतीत नाराजीच्या चर्चा, शिंदेंच्या आमदाराला काँग्रेसची ऑफर, नरेंद्र भोंडेकर यांची पहिली प्रतिक्रिया

एसटी बसलादेखील टोलमाफी

गणेशोत्सवासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यांतून कोकणात जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसनाही टोलमाफीची सुविधा देण्यात येणार आहे. संबंधित जिल्ह्यांतून कोकणाकडे रवाना होणाऱ्या एसटी बससाठी आवश्यक पास संबंधित पोलीस किंवा प्रादेशिक परिवहन विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येतील. टोलमाफीचा पास बसला लावून किंवा दाखवून संबंधित बसना टोल नाक्यावरून सवलतीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनाही या निर्णयाचा फायदा होणार आहे.

राज्य शासनाकडून यंत्रणांना महत्त्वाच्या सूचना

गणेशोत्सवाच्या काळात महामार्गांवर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने वाहतूक सुरळीत ठेवणे हे प्रशासनासमोरील महत्त्वाचे आव्हान असते. टोलमाफीच्या निर्णयामुळे टोल नाक्यांवर होणारी गर्दी आणि संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पोलीस आणि परिवहन विभागाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशभक्तांना पास मिळविणे, त्याची तपासणी करणे आणि टोलमाफीचा लाभ मिळवून देणे ही प्रक्रिया सुलभ आणि वेगवान करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक नियोजन करावे, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.

गणेशोत्सवाच्या कालावधीत टोलमाफीची सुविधा आणि पास उपलब्धतेबाबतची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलीस आणि परिवहन विभागाने आवश्यकतेनुसार सूचना, जाहिराती आणि जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांना माहिती द्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. कोणत्या मार्गावर टोलमाफी लागू आहे, पास कुठे मिळेल आणि परतीच्या प्रवासासाठी पास कसा ग्राह्य राहील, याबाबत स्पष्ट माहिती गणेशभक्तांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Maharashtra TimesGautami Patil : गौतमी पाटील हिच्या अडचणी वाढवणारी मोठी बातमी, भाजप नगरसेविकेची पोलीस ठाण्यात तक्रारगणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणाकडे जाणारा प्रत्येक गणेशभक्त हा आपल्या कुटुंबासह आनंदाने आणि सुरक्षितपणे आपल्या गावी पोहोचावा, यासाठी शासनाने विविध पातळ्यांवर नियोजन केले आहे. टोलमाफीसोबतच वाहतूक व्यवस्थापन, पोलीस बंदोबस्त, मार्गावरील आवश्यक सुविधा आणि विविध विभागांमधील समन्वय यावरही भर देण्यात येत आहे.

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रतिक्रिया

“गणेशोत्सव हा प्रत्येकाच्या भावनेशी जोडलेला सण आहे. आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी कोकणातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि आनंददायी व्हावा, यासाठी शासनाने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे.

गणेशभक्तांना प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि संवेदनशीलतेने काम करावे,” असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना आर्थिक दिलासा मिळणार असून, त्यांच्या प्रवासातील अडथळे कमी होण्यास मदत होणार आहे. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी कोकणाकडे निघालेल्या भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा आणि गणेशोत्सवाचा आनंद अधिक द्विगुणित व्हावा, या उद्देशाने शासनाने ही विशेष टोलमाफी लागू केली आहे.