• Sun. Jun 14th, 2026

    इकडे राजन साळवींनी साथ सोडली, तिकडे आदित्य ठाकरे दिल्लीला रवाना, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

    इकडे राजन साळवींनी साथ सोडली, तिकडे आदित्य ठाकरे दिल्लीला रवाना, पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

    राजन साळवी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. त्यामुळे कोकणात ठाकरेंसाठी हा मोठा धक्का आहे. एकीकडे हा धक्का बसत असतानाच आदित्य ठाकरे हे आज दिल्लीला रवाना झाले आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नवी दिल्ली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर गेल्याची माहिती आता समोर येत आहे. दिल्लीत नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आप पक्षाला पाठिंबा देण्यात आला होता. पण आपचा या निवडणुकीत पराभव झाला. तर भाजपची तब्बल 3 दशकांनंतर दिल्लीत सत्ता आली. या निकालाची पार्श्वभूमी असताना आमदार आदित्य ठाकरे आता दिल्लीला रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.

    एकीकडे दिल्लीत काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याकडून सत्कार करण्यात आला. या सत्काराच्या कार्यक्रमावरुन खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत ठिणगी पडलेली दिसत आहे. तसेच ठाकरेंचे शिलेदार राजन साळवी यांनी त्यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या सर्व घडामोडींदरम्यान आदित्य ठाकरे दिल्लीला गेल्याने त्यांच्या दौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

    आदित्य ठाकरे केजरीवालांची भेट घेणार

    आदित्य ठाकरे हे दिल्लीत इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या भेटीसाठी गेल्याची माहिती मिळत आहे. आदित्य ठाकरे दिल्लीत त्यांच्या पक्षाच्या खासदारांची भेट घेऊन चर्चा करण्याची शक्यता आहे. तसेच ते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीदेखील भेट घेण्याची शक्यता आहे. याशिवाय ते इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

    एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर होईना? मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक, पण शिंदेंची दांडी, नेमकं काय कारण?

    इंडिया आघाडीची पुन्हा घडी बसवण्याचे प्रयत्न?

    दिल्ली विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीत बिघाडी झालेली बघायला मिळाली. कारण काँग्रेस आणि आप हे दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले. त्याचा फटका हा दोन्ही पक्षांना बसला आणि भाजपला त्याचा मोठा फायदा झाला. या दोन्ही पक्षांनी सामंजस्याने निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला असता तर कदाचित निवडणूक निकालाच्या दिवशी चित्र वेगळं असतं. याशिवाय प्रचाराचं चित्र देखील वेगळं असतं. पण काँग्रेस आणि आप यांच्यातील मतभेदांमुळे दिल्लीत भाजपचं सरकार येण्यास पोषक वातावरण निर्माण झालं. त्यामुळे याबाबत आदित्य ठाकरे दिल्लीत जावून इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत मंथन करण्याची शक्यता आहे. तसेच इंडिया आघाडीची मोट पुन्हा एक बांधण्याचे प्रयत्न आदित्य ठाकरे यांच्याकडून केले जाण्याची शक्यता आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed