• Fri. Mar 13th, 2026

    ‘काँग्रेस राजकारणातला भस्मासूर, ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला तो भस्म’, श्रीकांत शिंदे यांची जहरी टीका

    ‘काँग्रेस राजकारणातला भस्मासूर, ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला तो भस्म’, श्रीकांत शिंदे यांची जहरी टीका

    Authored byचेतन पाटील | Reported by प्रदिप भणगे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 11 Feb 2025, 7:48 pm

    खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज लोकसभेत काँग्रेसवर सडकून टीका केली. “काँग्रेस पक्ष हा राजकारणातला भस्मासूर आहे. तसेच काँग्रेसच्या भस्मासूराने महाराष्ट्रात ‘यूबीटी’ची मशाल विझवून टाकली तर घडाळ्याची स्थिती बिकट केली”, अशी खोचक टीका श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत केली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नवी दिल्ली : “काँग्रेस पक्ष हा राजकारणातला भस्मासूर आहे. काँग्रेसने ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला ते भस्म झाले”, असा घणाघात शिवसेना संसदीय पक्षाचे गटनेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज लोकसभेत केला. केंद्रीय अर्थसंकल्पावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने आपली भूमिका मांडली. मध्यमवर्गाला खूश करणारा बजेट सादर करुन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोध पक्षाला चेकमेट केले, अशा शब्दांत खासदार श्रीकांत शिंदे यांनी बजेटचे कौतुक केले. तर “काँग्रेसच्या भस्मासूराने महाराष्ट्रात ‘यूबीटी’ची मशाल विझवून टाकली तर घडाळ्याची स्थिती बिकट केली. ज्यांनी हिंदुत्व सोडले आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली त्यांची काय अवस्था झाली हे महाराष्ट्रात निवडणुकीतून दिसून आले”, असा खोचक टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी लगावला.

    ‘काँग्रेस सरकारने बँकांना लुटण्याचे काम केलं’

    “काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चीनच्या प्रवक्त्यांप्रमाणे भाषण केले. मेक इन इंडियांला शिव्या देणारे केवळ सरकारलाच नाही तर देशातील प्रत्येक कामगार, अभियंता, शास्त्रज्ञ, डॉक्टर्स यांना ते शिव्या देतात. या सर्वांच्या प्रयत्नांमुळेच मेक इन इंडिया यशस्वी झाले. दुसरीकडे काँग्रेस सरकारच्या काळात बँकांची अवस्था बिकट झाली आणि ‘यूपीए’ कमी आणि ‘एनपीए’ची जास्त चर्चा झाली. बँकांना लुटण्याचे काम काँग्रेस सरकारने केले. मात्र या सर्व बँकांना ‘एनडीए’ सरकारने १० वर्षात एनपीएच्या दृष्टचक्रातून बाहेर काढले”, अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली.

    ‘काँग्रेस सरकार स्कॅम्ससाठी कुप्रसिद्ध’

    “इंडिया आघाडीत काँग्रेस हा एक असा बॅट्समन आहे जो आघाडीतील इतरांना रनआऊट करत आहे. यंदाच्या बजेटने विरोधी पक्षांची बोलती बंद केली. ‘एनडीए’ सरकार स्कीम्ससाठी ओळखली जाते तर काँग्रेस सरकार स्कॅम्ससाठी कुप्रसिद्ध होते. २०१४ मध्ये काँग्रेसने भारताला अधु अर्थव्यवस्था दिली होती. त्यावेळी भारताचं बजेट १७ लाख ९४ हजार कोटींचे होते. आज भारताचे बजेट ५० लाख ६४ हजार कोटींचे आहे. ज्यात ३९ लाख ४४ हजार कोटींचा महसुली खर्च आणि ११ लाख २१ हजार कोटींचा भांडवली खर्चाचा समावेश आहे. ‘एनडीए’च्या काळात भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनली”, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.

    मोदी सरकारने काय-काय कामे केली? श्रीकांत शिंदेंनी यांदी सांगितली

    मागील १० वर्षात केंद्र सरकारने केलेल्या कामांचा यावेळी श्रीकांत शिंदे यांनी आढावा घेतला. “भारतात केवळ ७४ एअरपोर्ट होते आज ही संख्या १९७ वर पोहोचली आहे. २०१४ मध्ये देशात ६ कोटी ब्रॉडबँड कनेक्शन होती आज ही संख्या ९४ कोटींवर गेली आहे. कोळसा उत्पादन ५६ मेट्रिक टन होते आज ९९७ मेट्रिक टन इतका वाढला आहे. संरक्षण बजेट २ लाख २४ हजार कोटी होते आज संरक्षण बजेट ६ लाख ८१ हजार कोटी इतका वाढला. ‘एफडीआय’ ३०५ बिलियन डॉलर्स होता तो आज ६० दरडोई उत्पन्न ‘जीडीपी’मध्ये ३५०० डॉलर होते ते आज ६००० डॉलर्सपर्यंत वाढले आहे”, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.

    आज देशात १.५ लाख किमीचे महामार्ग आहेत. ‘इनोव्हेशन इंडेक्स’मध्ये भारत आज ३९ स्थानी आहे. कर्नाटक राज्यात काँग्रेसने पाच गॅरंटी देऊन सत्ता मिळवली मात्र आज कर्नाटक सरकारला ४८००० कोटींचे कर्ज घ्यावे लागले. हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकारला १५० कोटी न भरल्याने त्यांचे दिल्लीत हिमाचल भवन जप्त झाले. तेलंगणात काँग्रेस सरकारने १० महिन्यात ५० हजार कोटींचे कर्ज घेतले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने कोरोना काळात खिचडी घोटाळा, बॉडीबॅग घोटाळा केले. त्यांचे मंत्री खंडणी वसुलीमुळे तुरुंगात गेले होते, अशी टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली.

    श्रीकांत शिंदेंकडून अर्थमंत्र्यांचं कौतुक

    “समाजातील प्रत्येक घटकाला काही ना काही देण्याचे काम बजेटने केले. या बजेटने दोन रेकॉर्ड केले आहेत. ‘एनडीए’चा हा सलग ११ वा अर्थसंकल्प आहे. निर्मला सीतारामन या पहिल्या अर्थमंत्री आहेत ज्यांनी सलग ८ वा अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यापूर्वी संरक्षण मंत्री देखील होत्या. त्यांच्या कार्यकाळात देश समृद्ध आणि सुरक्षित राहिला, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर टिम इंडियाचे कर्णधार असतील तर सीतरामन या संघाला विजय मिळवून देणाऱ्या अष्टपैलु खेळाडू आहेत”, असे कौतुकोद्वार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत काढले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed