• Fri. Jul 31st, 2026

    अण्णा भाऊंच्या नावाचे नाट्यगृह त्यांचा विचार आणि साहित्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणारे केंद्र ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 31, 2026
    अण्णा भाऊंच्या नावाचे नाट्यगृह त्यांचा विचार आणि साहित्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणारे केंद्र ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि. ३१ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. चिरागनगर येथे त्यांच्या स्मारक व संशोधन केंद्राच्या उभारणीसह भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण हा त्या दिशेने महत्त्वाचा टप्पा असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हे नाट्यगृह त्यांचा विचार आणि साहित्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणारे केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, बृहन्मुंबईतील लोकप्रतिनिधी, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, महानगरपालिका समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, स्थानिक नगरसेवक यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे वास्तव्य असलेल्या चिरागनगर येथे स्मारक उभारण्याच्या मागणीची पूर्तता करत राज्य शासनाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आणि संशोधन केंद्र उभारण्याचे काम सुरू केले आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेने नूतनीकरण केलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण होणे, ही आनंदाची बाब आहे. येथे नाट्यप्रयोगांसाठी आवश्यक असलेल्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मंचाची क्षमता वाढविणे, कलाकारांसाठी सुसज्ज ग्रीनरूमची व्यवस्था करणे, यासह विविध सुधारणा करण्यात आल्याने आता सर्व प्रकारची दर्जेदार नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रम येथे सादर करता येतील. अभिजात कला, संस्कृती आणि साहित्य यांना प्रोत्साहन देतानाच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सांस्कृतिक संधी पोहोचविण्याचे कार्य या माध्यमातून व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करुन नाट्यगृहाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी महानगरपालिकेचे कौतुक केले.

    लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य वास्तववादी असून त्या काळातील सामाजिक परिस्थिती, अन्याय, संघर्ष आणि कामगारांचे जीवन यांचे प्रभावी चित्रण त्यातून दिसून येते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेल्या अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखणीच्या बळावर सामाजिक परिवर्तनाचा संदेश दिला. त्यांच्या साहित्याची व्याप्ती जागतिक स्तरावर पोहोचली असून त्यांच्या साहित्याचे २७ भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची आणि मराठी भाषेची कीर्ती जगभर पोहोचविण्यात त्यांचे योगदान अमूल्य असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

    अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृती जतन करण्यासाठी विविध ठिकाणी स्मारके – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    क्रांतिसूर्य साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपले आयुष्य शोषित, पीडित, दलित, कष्टकरी आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी समर्पित केले. त्यांच्या साहित्याने आणि शाहिरीने सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली; तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जनजागृती करून जनसामान्यांना प्रेरित करण्याचे ऐतिहासिक कार्य केले, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

    राज्य शासनाच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृती जतन करण्यासाठी विविध ठिकाणी स्मारके उभारली जात असून सांगली जिल्ह्यातील जन्मगाव असलेल्या वाटेगाव येथेही स्मारकाची उभारणी करण्यात येत आहे.

    अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे संघर्षमय जीवनाचे वास्तववादी चित्रण करणारे आहे. नाटक हा मराठी माणसाच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग असून नाट्यगृहाच्या नूतनीकरणामुळे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह आधुनिक, सुसज्ज आणि कलाकारांसाठी उपयुक्त झाले आहे. या नाट्यगृहातून नवोदित कलाकारांना संधी मिळेल; तसेच अण्णा भाऊ साठे यांचे विचार अधिक व्यापक स्तरावर पोहोचतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी व्यक्त केला.

    नाट्यगृह नव्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देईल – महापौर रितू तावडे

    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या संघर्षाला शब्दबद्ध करत सामान्य माणसाला नायकाच्या भूमिकेत उभे केले. नूतनीकृत नाट्यगृह हे त्यांच्या विचारांना आणि सांस्कृतिक वारशाला तसेच नव्या कलाकारांना आणि नव्या विचारांना व्यासपीठ उपलब्ध करून देईल, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाद्वारे केले.

    महापौर तावडे म्हणाल्या की, सुमारे 40 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले हे अत्याधुनिक वातानुकूलित नाट्यगृह 761 आसनक्षमतेचे आहे. त्यामध्ये ग्रीनरूम, मेकअप रूम, विद्युत जनित्र, सीसीटीव्ही यंत्रणा आणि आधुनिक अग्निसुरक्षा सुविधा उपलब्ध आहेत. नाट्यगृह परिसरात पुस्तक विक्री दालन; तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनपटावर आधारित प्रदर्शनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या काळात हे नाट्यगृह नाटकांसह विविध सांस्कृतिक आणि सार्वजनिक उपक्रमांचे महत्त्वाचे केंद्र, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी आभार प्रदर्शन करताना या नाट्यगृहाच्या नुतनीकरणामध्ये सहकार्य केलेल्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

    ००००

    बी.सी.झंवर/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed