• Thu. Mar 12th, 2026

    ‘अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही’, एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराचा जोरदार निशाणा, महायुतीत काय घडतंय?

    ‘अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही’, एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराचा जोरदार निशाणा, महायुतीत काय घडतंय?

    महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजण्याआधीच आता शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगताना दिसत आहे. नांदेडमध्ये शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना जोरदार टोला लगावला आहे. त्यामुळे नांदेडमध्ये महायुतीत नेमकं काय सुरु आहे? असा प्रश्न उपस्थित होतोय.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नांदेड : शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही. ते भाजपमध्ये नवीन आहेत. त्यांना युती धर्माची कमी माहिती, अशी खोचक टीका हेमंत पाटील यांनी केली. महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे संकेत अशोक चव्हाण यांनी दिले होते. त्यावरुन शिवसेनेच्या हेमंत पाटलांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यांच्या टीकेवर आता अशोक चव्हाण यांच्याकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं आहे.

    हेमंत पाटील नेमकं काय म्हणाले?

    “त्यांचं स्वबळ आहे तर आमचंही स्वबळ आहे ना? प्रत्येकाला आपापल्या पक्षाला वाढवण्याचा अधिकार आहे. अशोक चव्हाण म्हणजे पूर्ण भाजप नाही. आम्ही पक्षश्रेष्ठी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावरही या गोष्टी घालू. आजपर्यंत युती धर्म म्हणून शिवसैनिकांनी भाजपचं काम केलं आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी युती धर्म म्हणून भाजपचं काम केलं आहे”, असं हेमंत पाटील म्हणाले.

    “अशोक चव्हाण कदाचित भाजपमध्ये नवीन आलेले आहेत. त्यामुळे त्यांना युती धर्माविषयी थोडी कमी माहिती असावी. पण गेल्या 35 ते 40 वर्षांपासून चैतन्य बापू देशमुख असतील, प्रवीण साले असतील, भाजपची अनेक जुनी जाणती मंडळी आहेत, आम्ही सातत्याने एकमेकांच्या हातात हात घेऊन काम केलं आहे”, अशी भूमिका हेमंत पाटील यांनी मांडली.

    महापालिका निवडणुकीत महायुती राहणार की नाही?

    महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर लगेच राज्यात या निवडणुका होणार आहेत. राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहारांच्या महापालिकांच्या निवडणुका या गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडल्या आहेत. या निवडणुका जिंकून आपल्या ताब्यात महापालिका करावी, असे प्रयत्न प्रत्येक पक्षाचे असणार आहेत.

    असं असलं तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकत्र निवडणूक लढवणारी महायुती महापालिका निवडणुकी देखील एकत्र लढवणार का? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. एकीकडे महायुतीचे काही नेते स्थानिक परिस्थिती, पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा सल्ल्यानुसार त्या त्या ठिकाणचे निर्णय घेऊ असं सांगत आहेत. तर काही जण एकत्र लढणार असल्याचं म्हणत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत युती राहणार की जाणार? ते पाहणं महत्त्वाचं राहणार आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed