अहिल्यानगरमध्ये 67 वा महाराष्ट्र केसरीचा थरारक अंतिम सामना पार पडला. या अंतिम सामन्यात पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ याने सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड याचा पराभव करत महाराष्ट्र केसरीची मानाची चांदीची गदा जिंकली.
67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आज अंतिम सामना पार पडला. त्याआधी गादी विभागामधून नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ तसेच माती विभागातून सोलापूरचा महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीचा साकेत यादव यांच्यात उपांत्य सामने पार पडले. गादी गटातून पृथ्वीराज मोहोळ अंतिम सामन्यात पोहोचला. तर माती गटातून महेंद्र गायकवाड हा अंतिम सामन्यात पोहोचला. यानंतर महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अंतिम सामन्याचा थरार रंगला.
अंतिम सामन्यावेळी काय-काय घडलं?
उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थित हा थरारक अंतिम सामना पार पडला. अहिल्यानगरमधील वाडिया पार्क मैदानात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील उपांत्य फेरीनंतर कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाला होता. शिवराज राक्षे याने पराभवानंतर पंचांना लाथ मारली होती. त्यामुळे मोठा राडा झाला होता. या राड्यानंतर थोड्या वेळाने अंतिम सामना खेळवण्यात आला.
गादी गटातून पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि माती गटातून सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यात ही लढत झाली. अतिशय अटीतटीची ही लढत झाली. दोन्ही पैलवान अतिशय ताकदीने कुस्ती खेळले. या थरारक सामन्यात सुरुवातीला पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळने आघाडी घेतली. त्याने पहिला पॉईंट मिळवला. यानंतर गायकवाडने एक गुण मिळवत सामन्यात बरोबरी केली. यानंतर पृथ्वीराजने महेंद्रला जोरदार चितपट करत रिंगनाच्या बाहेर पाठवलं. त्यामुळे पृथ्वीराजला आणखी एक गुण मिळवत अंतिम सामन्याचा तो विजेता ठरला.

