• Tue. Jun 16th, 2026

    ‘आम्ही काय भाजपसोबत लग्न केलं नाही’, छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

    ‘आम्ही काय भाजपसोबत लग्न केलं नाही’, छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

    राष्ट्रवादी काँग्रेस आज महायुतीत सहभागी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा एक प्रमुख घटक पक्ष आहे. या पक्षात छगन भुजबळ हे नेते देखील आहेत. त्यांनी आज महायुतीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “आम्ही भाजपसोबत लग्न केलेलं नाही”, असं मिश्किल वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी एका मुलाखतीच्या कार्यक्रमात ‘आम्ही काय भाजपसोबत लग्न केलं नाही’, असं मिश्किल वक्तव्य केलं. भाजपसोबत सत्तेत स्थापन झाल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. “विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीवेळी भाजपने शिवसेनेला सोडलं. आम्ही एक तासात जाहीर केलं की, आम्ही काँग्रेसला सोडलं. 54 लोकांनी सह्या केल्या होत्या. पण आता जे शरद पवार यांच्यासोबत आहेत त्या आमदारांची सुद्धा आपण सत्तेत सहभागी होऊयात अशी भूमिका होती. तळ्यात मळ्यात करण्याऐवजी आता काय तो निर्णय घ्या आणि चला. मग आलो”, असं छगन भुजबळ म्हणाले.

    जाधवर इन्स्टिट्यूटकडून छगन भुजबळ यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी छगन भुजबळ यांना मिश्किल प्रश्न विचारण्यात आला की, मुलांच्या भाषेत बोलायचं झालं तर ज्येष्ठ नेते शरद पवार भाजपला आय लव्ह यू म्हणत होते, पण लग्न करत नव्हते? त्यावर भुजबळांनी देखील मिश्किलपणे उत्तर देत, “आम्ही भाजपसोबत कुठे लग्न केलं आहे? आम्ही फक्त त्यांच्या बरोबर आहोत”, असं म्हटलं.

    छगन भुजबळ तेलगी प्रकरणावर काय म्हणाले?

    छगन भुजबळ यांनी यावेळी तेलगी प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. “तेलगी प्रकरणात माझं नाव सीबीआयने देखील घेतलं नाही. तरीही शरद पवार यांनी मला उपमुख्यमंत्री आणि गृह मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावला. पवारांनी राजीनामा घ्यायची घाई केली”, असं छगन भुजबळ म्हणाले.

    “हे तेलगी प्रकरण दोन-तीन राज्यात होतं म्हणून मी सुप्रीम कोर्टात गेलो. तिथे सांगितलं की, ही केस सीबीआयकडे घ्या. ट्रकभर कागद आणले, पण त्यामध्ये छगन भुजबळ हे नाव कुठेही नव्हतं. मला सांगा, ज्या प्रकरणात सीबीआयनेदेखील माझं नाव घेतलं नाही त्या प्रकरणामुळे मला उपमुख्यमंत्री म्हणून राजीनामा द्यावा लागला. माझ्यावर शिक्का बसला की, हा तेलगी प्रकरणातील आहे म्हणून. मला शरद पवारांना सांगायचं आहे की, साहेब राजीनामा घेण्याची घाई तुम्ही केली”, असं छगन भुजबळ म्हणाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed