• Mon. Jun 15th, 2026

    राज ठाकरे यांना भाजपकडून पहिलं प्रत्युत्तर, काँग्रेसचा उल्लेख करत बावनकुळे काय म्हणाले?

    राज ठाकरे यांना भाजपकडून पहिलं प्रत्युत्तर, काँग्रेसचा उल्लेख करत बावनकुळे काय म्हणाले?

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी बावनकुळे यांनी काँग्रेसच्या ईव्हीईमबाबत ठरवलेल्या अजेंड्यासोबत न जाण्याची विनंती राज ठाकरेंना केली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अमरावती : मनसेचा नुकताच मुंबईत कार्यकर्ता मेळावा पार पडला. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीवर शंका उपस्थित केली. विधानसभा निवडणुकीचा जो निकाल समोर आला तो अनपेक्षित होता. त्यामुळे निकालानंतर राज्यभरात जल्लोषाऐवजी शांतता पसरलेली बघायला मिळाली, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. त्यांच्या या भूमिकेला आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसने ईव्हीएमबाबत जो अजेंडा ठरवला आहे त्याच अजेंडावर राज ठाकरेंनी जावू नये, अशी विनंती चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

    “राज ठाकरे आमच्यासाठी आदरातिथ्य व्यक्तीमत्व आहेत. त्यांना माझी एक विनंती आहे की, काँग्रेस पक्ष ज्याप्रकारे पराभवातूनही सुधारताना दिसत नाही, काँग्रेस निवडणुकीत पराभावानंतर ईव्हीएमवर खापर फोडत आहे. ज्या राज्यात काँग्रेसचं सरकार बनलं तिथे ईव्हीएम बरोबर होतं. महाराष्ट्रात सरकार बनलं नाही तर ईव्हीएम खराब आहे? मला वाटतं की, आपण आत्मपरीक्षण करायला हवं”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
    ‘मी पुन्हा येईन हे माझा पिच्छाच सोडत नाही’, देवेंद्र फडणवीस उद्विग्नपणे नेमकं काय म्हणाले?
    “आम्हाला महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर हवं तसं यश मिळालं नव्हतं. त्यावेळी आम्ही आत्मपरीक्षण केलं होतं. आम्ही त्यावेळी ईव्हीएमवर खापर फोडलं नाही. आम्ही कोणत्या ठिकाणी आपला पराभव झाला आहे, तिथला अभ्यास केला आणि त्या दृष्टीकोनातून काम केलं. हे विरोधी पक्षांनी केलं पाहिजे. आपला पराभव का झाला? याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. पण ते पराभव मानायला तयार नाहीत. काँग्रेसचा ईव्हीएमबाबत एक अजेंडा ठरलेला आहे. राज ठाकरे यांच्या सारखी उच्च आणि प्रगल्भ विचारांची व्यक्ती काँग्रेसचा अजेंडा मानणार नाहीत, अशी माझी भावना आहे”, असं मत बावनकुळे यांनी मांडलं.

    महापालिका निवडणुका स्वबळावर लढवणार?

    यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी असे आम्ही सर्व जण एकत्र बसलो. यावेळी आम्ही असा निर्णय केला आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला स्थानिक पातळीवरील पदाधिकारी जो निर्णय घेतील त्या अनुषंगाने आम्ही निर्णय घेऊ. स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थिती पाहून त्या ठिकाणी स्वतंत्र की एकत्र महायुतीत निवडणूक लढवायची हा निर्णय घेऊ. पण राज्य म्हणून विचार केला तर महायुती म्हणूनच लढलं पाहिजे अशी स्पष्ट सूचना आहे. त्या ठिकाणी जी काही स्थानिक समीकरणं असतील ते विचारात घेऊन काम करु”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed