जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पेटलेला वाद आता वाढत चालला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरेंच्या पालकमंत्रिपदाला शिवसेनेचा विरोध कायम आहे.
अलिबाग तालुक्यातील कुसुंबळेमध्ये स्वर्गीय प्रमोद ठाकूर प्रवेशद्वार नामकरण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी शिंदेसेनेच्या आमदारांनी खासदार तटकरेंवर शरसंधान साधलं. आम्ही एकनाथ शिंदेंसमोर आमची कैफियत मांडली. भरत गोगावलेंचं नाव शर्यतीमधून गायब करण्यात आलं. शिष्टाचारानुसार त्यांनाच पालकमंत्रिपद मिळायला हवं होतं, असं आमदार महेंद्र दळवी म्हणाले. ‘तटकरेंनी गोगावलेंचं नाव यादीतून हटवण्यासाठी त्यांची जादू चालवली. यादीतून नाव गायब करणं हा त्यांचा स्वभाव आहे. गोगावले मंत्री झाल्यास पालकमंत्रिदेखील तेच होणार याची तटकरेंना कल्पना होती. त्यामुळेच त्यांनी पालकमंत्रिपद खेचून घेतलं. पण आमच्या आक्रोशानंतर मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची स्थगिती दिली. आता येत्या ४ दिवसांत भरत गोगावले पालकमंत्री होतील, अशी आशा आम्हाला आहे,’ असं दळवी म्हणाले.
भोजपुरी, तमिळ, कन्नड भाषेत समालोचन होतं, मग मराठीत का नाही? हॉटस्टारनं मनसेला कारण सांगितलं
‘सुनील तटकरेंचा इतिहास सगळ्यांनाच माहीत आहे. तटकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा वापर करुन दबावतंत्र वापरलं. त्यांनी प्रोटोकॉलचं पालन केलं नाही. तटकरे पालकमंत्रिपद खेचून आणण्यात यशस्वी झालेले असले तरी येत्या काही दिवसांत ते अयशस्वी ठरतील,’ असं महेंद्र दळवींनी म्हटलं. तटकरेंनी आतापर्यंत लोकांना फसवण्याचाच धंदा केला. आता तटकरेंविरोधात एक मोहीम सुरु झालेली आहे. तटकरे हटाव मोहीम सुरु करण्यात आलेली आहे. येणाऱ्या काळात तटकरेंना जिल्ह्यात फिरु देणार नाही, अशा शब्दांत दळवींनी तटकरेंना असलेला प्रखर विरोध बोलून दाखवला.
रायगडमध्ये शिवसेनेचे ३ आमदार आहेत. भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे असे ३ आमदार असूनही केवळ १ आमदार असलेल्या राष्ट्रवादीला पालकमंत्रिपद मिळाल्यानं सेनेच्या गोटात नाराजी आहे. तटकरेंवर जोरदार टीका करणाऱ्या शिवसेनेच्या तीन आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी लक्ष्य केलं आहे. सेनेच्या तीन आमदारांचा उल्लेख त्यांनी थ्री इडियट्स असा केला. ‘माझी शिंदे साहेबांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या थ्री इडियस्टला जरा आवर घालावा. यांच्यामुळे युतीत मिठाचा खडा टाकू नये,’ असं चव्हाण म्हणाले.
डॉक्टरचं अपहरण, ६ कोटींची खंडणी मागितली; मग ३०० रुपये देऊन सोडलं; चक्रावून टाकणारं प्रकरण
‘महेंद्र थोरवे यांनी त्यांचा राजकीय अस्त करायचा असेल तर खुशाल करुन घ्यावा. तटकरे साहेब काय आहेत हे त्यांना चांगले माहीत आहे. ते कोणत्या व्हिडिओबद्दल बोलत आहेत माहीत नाही. पण गुवाहाटीला टेबलावर नाचायचा व्हिडीओ पाहिला तर भरत शेठ गोगावलेंना सांगा, हातात घेऊन फिरणारा गमछा जरा तोंडावर टाका. तोंडाला आवर घाला,’ असा टोला चव्हाण यांनी हाणला.

