• Mon. Sep 7th, 2026

संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जाणाऱ्या जीवनदूतांचे कार्य अतुलनीय – पालकमंत्री भरतशेठ गोगावले – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 7, 2026

रायगड-अलिबाग, दि. ७ :- अपघात, पूर, दरड कोसळणे, अतिवृष्टी तसेच अन्य आपत्तीच्या प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जाणाऱ्या ‘जीवनदूतां’चे कार्य अतुलीनीय आहे. त्यांच्या या धैर्याचा आणि सेवाभावाचा सन्मान करणे ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी केले.

रायगड पोलीस आयोजित ‘रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत जीवनदूत सन्मान सोहळा 2026 चे येथील आर.सी.एफ. सभागृह, कुरुळ  येथे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पालकमंत्री श्री. गोगावले बोलत होते.

कार्यक्रमास  जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उप नगराध्यक्षा श्रीमती मानसी म्हात्रे, रिलायन्स ग्रुपचे शशांक गोयल आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री भरतशेठ गोगावले म्हणाले, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढणार आहे. या काळात वाहतूक कोंडी तसेच अपघात टाळण्यासाठी पोलीस, जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेने समन्वयाने काम करावे. रस्त्यावर अपघात झाल्यास तातडीने बचावकार्य सुरू करता यावे यासाठी प्रशासनाने रेस्क्यू पथकांना आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी. जिल्ह्यातील उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही रेस्क्यू पथकांना आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

ते पुढे म्हणाले, तसेच गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलीस व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे. रस्ता सुरक्षा ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक वाहनचालकाचीही जबाबदारी आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, मद्यपान करून किंवा अतिवेगाने वाहन चालवू नये. “वेगापेक्षा सुरक्षा महत्त्वाची, स्टाईलपेक्षा हेल्मेट महत्त्वाचे आणि घाईपेक्षा जीवन महत्त्वाचे असल्याचेही पालकमंत्री श्री. गोगावले यावेळी म्हणाले.

जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले, रायगड हा समुद्रकिनारा, डोंगर-दऱ्या, महामार्ग, पर्यटनस्थळे आणि औद्योगिक क्षेत्रे असलेला विविधांगी जिल्हा आहे. त्यामुळे येथे विविध प्रकारच्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींचा सामना करावा लागतो. अशा प्रत्येक संकटाच्या वेळी रेस्क्यू पथके अत्यंत धैर्याने कार्य करतात. अतिवृष्टी, पूर, दरड कोसळणे, महामार्गावरील अपघात तसेच औद्योगिक दुर्घटनांच्या वेळी रेस्क्यू पथकांनी अत्यंत धैर्याने काम केले आहे. “स्वतःचा जीव धोक्यात घालून संकटातील व्यक्तीच्या मदतीला धावून जाण्यासाठी विशेष धैर्य आणि सेवाभाव आवश्यक असतो. रायगडच्या या जीवनदूतांनी प्रत्येक संकटात प्रशासनाला मोठी साथ दिली असल्याचेही ते म्हणाले.

प्रास्ताविकात जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल म्हणाल्या, आपत्तीच्या बिकट परिस्थितीत रेस्क्यू पथकांचे योगदान अत्यंत महत्वाचे ठरले. विनाशकारी परिस्थितीत देवदूताचे रूप घेऊन मदतीला धावून येणाऱ्या रेस्क्यू टीम्सचे कार्य प्रशंसनीय आहे. त्यांची कामगिरी केवळ मोठ्या दुर्घटनांपुरती मर्यादित नसून दररोज विविध स्वरूपातील संकटांमध्ये नागरिकांना त्यांची मोठी मदत होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी हेल्प फाउंडेशन, शेलार मामा रेस्क्यू, संघर्ष एक समाज सेवेसाठी, फ्लाइंग बर्ड्स श्रीवर्धन, पोलादपूरचे सह्याद्री वन्यजीव पथक, एलअँडटी कन्स्ट्रक्शन रेस्क्यू टीम, नेरळ-माथेरान रेस्क्यू टीम, प्रतापगड रेस्क्यू, महाबळेश्वर ट्रेकर्स, महाड परिसरातील रेस्क्यू पथक तसेच जिल्ह्यातील विविध सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

मान्यवरांच्या हस्ते रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनास रिलायन्स फाउंडेशन, नागोठणे सीएसआर निधीतून बचाव नौका आणि बचाव साहित्य किट सुपूर्त करण्यात आला. कार्यक्रमास पदाधिकारी,अधिकारी तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी, रेस्क्यू पथक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed