Mumbai Coastal Road: उत्तर वाहिनी पुलाचे (मरिन ड्राइव्ह ते सी लिंक दिशेने जाणारा) २६ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
हायलाइट्स:
- सी लिंकला जोडणाऱ्या पुलावरून २७ जानेवारीपासून दुतर्फा वाहतूक
- उत्तर वाहिनी पूल २६ जानेवारीला खुला होणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
या मार्गातील दक्षिण मुंबईकडून उत्तर मुंबईकडे जाणारी वाहतूक वरळी-वांद्रे सी लिंकला जोडण्यासाठी दोन पूल बांधण्यात आले आहेत. त्यातील दक्षिणेकडे येण्यासाठी बांधलेल्या पहिल्या पुलाचे सप्टेंबर २०२४मध्ये लोकार्पण झाले. वाहतुकीचा ताण कमी व्हावा यासाठी दक्षिण वाहिनी पुलावरून उत्तरेकडे (वांद्रेकडे)जाणाऱ्या वाहतुकीला मुभा देण्यात आली होती. आता उत्तर वाहिनी पुलाचे काम पूर्ण झाले आहे. लोकार्पण होणाऱ्या पुलाची लांबी ८२७ मीटर इतकी आहे. यामध्ये समुद्रावर असलेली लांबी ६९९ मीटर, तर पोहोच रस्ता १२८ मीटर यांचा समावेश आहे. पुलांचे काम पूर्ण झाल्यामुळे सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे, वरळी सी लिंकची वरळीकडील दोन्ही टोक आता थेट जोडली गेली आहेत.
सागरी किनारामध्ये प्रियदर्शनी पार्कपासून तर वरळीपर्यंत जवळपास ४.३५ किमी अंतरापर्यंत म्हणजे ४.८३ हेक्टर इतक्या क्षेत्रावरील दुभाजकांचे टाटा सन्स लिमिटेड अँण्ड अफेलेट्सकडून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. याचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
आंतरमार्गिकाही खुल्या होणार
मरिन ड्राइव्हकडून प्रभादेवीकडे किनारा मार्गावरून जाण्यासाठी बांधलेली आंतरमार्गिकाही खुली होणार आहे. तसेच मरिन ड्राइव्हकडून बिंदू माधव ठाकरे चौकाकडे जाणारी वाहतूकही खुली होणार आहे. त्यामुळे लोअर परळ, वरळी नाका आणि लोटस जंक्शनकडे जाणारी वाहतूक खुली होईल. तसेच बिंदू माधव ठाकरे चौकातून सी लिंकला जोडणारी आणि वांद्रेच्या दिशेने जाणारी आंतरमार्गिकाही सुरू होणार आहे

