• Sat. Jan 18th, 2025
    मुंबईकरांनो सावधान, आता प्लास्टिक बाळगल्यास भरावा लागेल ‘इतका’ दंड; सोमवारपासून होणार कारवाई

    Plastic Ban In Mumbai: येत्या सोमवारपासून मुंबईत कारवाईसाठी विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. एखाद्याजवळ प्लास्टिक आढळल्यास थेट दंड आकारण्यात येणार आहे. या कारवाईचे आदेश महापालिका मुख्यालयातून सर्व वॉर्डस्तरावर देण्यात आल्या आहेत.

    हायलाइट्स:

    • वापर करणाऱ्यावर कारवाई करण्याची सिद्धेश कदम यांची सूचना
    • कारवाईचे आदेश पालिका मुख्यालयातून मुबईतील सर्व वॉर्डस्तरावर जारी
    • वापर करणाऱ्या सर्वसामान्यावरही कारवाई करण्यात येणार
    महाराष्ट्र टाइम्स
    plastic bag

    मुंबई : प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी अलीकडेच दिल्या होत्या. त्यानुसार मुंबई महापालिकेने बाजार, दुकाने आदी ठिकाणी जनजागृती मोहीम हाती घेतली असून, येत्या सोमवारपासून मुंबईत कारवाईसाठी विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. एखाद्याजवळ प्लास्टिक आढळल्यास थेट दंड आकारण्यात येणार आहे. या कारवाईचे आदेश महापालिका मुख्यालयातून सर्व वॉर्डस्तरावर देण्यात आल्या आहेत.मुंबईत २६ जुलै २००५ रोजी आलेल्या महापुराला प्लास्टिक पिशव्याही कारणीभूत ठरल्या होत्या. त्यानंतर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली. या बंदीनंतर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री किंवा त्या बाळगणाऱ्यांवर मुंबई महापालिकेकडून कारवाईला सुरुवात झाली. करोनाकाळात ही कारवाई थंडावली आणि त्यानंतर मुंबई महापालिकेने १ जुलै २०२२पासून बंदी घातलेल्या प्लास्टिकविरोधी मोहिमेला पुनरुज्जीवित केले होते. त्यानुसार बाजार, दुकाने आणि आस्थापना, परवाना विभागाचे प्रभागनिहाय पथक आपापल्या भागातील दुकानांना भेट देतानाच बंदी असलेले प्लास्टिक जप्त करून दंड करू लागले. ही कारवाई निरंतर सुरूच असली तरीही त्याला पूर्णपणे आळा बसलेला नाही.
    दिंडोरी संशयाच्या फेऱ्यात! फरार असताना वाल्मीक कराडचा मुक्काम, फूटेज जप्त, गुरुपीठाने फेटाळले आरोप
    जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबई महापालिका मुख्यालयात ‘एमपीसीबी’सोबत मुंबई महापालिकेने विशेष बैठकीचे आयोजन केले होते. महापालिका कार्यक्षेत्रातील हवेची गुणवत्ता, घनकचरा, एकल वापराचे प्लास्टिक इत्यादी पर्यावणरविषयक विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी ‘एमपीसीबी’चे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी, प्लास्टिकमुक्तीसाठी प्लास्टिकची विक्री व वापर करणाऱ्या सर्वसामान्यांवर नियम उल्लंघन कारवाई करण्यात येणार असून तसे आदेश दिल्याचे सांगितले होते.
    Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीस जाणार दावोसला; २० जानेवारीपासून जागतिक आर्थिक परिषद
    त्यानुसार महापालिकेकडून गेल्या आठवड्याभरापासून मुंबईतील बाजार, दुकाने आणि आस्थापना आदी ठिकाणी जनजागृती करून प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन केले जात आहे. प्लास्टिक बाळगल्यास दंड आकारला जाईल, असा इशाराही दिला जात असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

    पाच ते २५ हजार रुपये दंड
    प्लास्टिकविषयी जनजागृती केली जात असतानाच, येत्या सोमवारपासून मुंबईतील बाजार, दुकाने, आस्थापना आदी ठिकाणी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या ९१ मंडयांतदेखील ही कारवाई होणार आहे. कायद्यानुसार प्लास्टिकचे उत्पादन व वापर केल्यास पाच हजार ते २५ हजार रुपये दंड असून तीन महिन्यांच्या कारावासाच्या शिक्षेचीही तरतूद आहे.
    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed