अकोला शहरात चायना मांजाने पतंग उडविताना एका व्यक्तीचा गळा चिरला जाऊन मृत्यू झाला. या घटनेने चार जण जखमीही झाले आहेत. प्रशासन वेळोवेळी चायना मांजा वापरण्यास मनाई करत असताना हा मांजा बाजारात कसा मिळतोय यावर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेऊन चायना मांजा वापरणे टाळावे.
आज मकर संक्रांतीच्या दिवशी चायनीज मांजाने अकोला शहरात खळबळ उडाली आहेय. चायना मांजाने एका व्यक्तीचा गळा चिरून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. अकोला शहरात आज सकाळपासून पतंग उडवीण्याच्या मस्तीमुळे वेगवेगळ्या ठिकाणी चारजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर नवीन पोलीस अधीक्षक कार्यालय समोरील उड्डाणपूल वरून खाली उतरतांना गळ्यात चायनीज मांजा अडकल्याने किरण प्रकाश सोनोने या व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. येत्या दोन दिवस नागरिकांनी चेहऱ्यावर रुमाल किंवा गमचा बांधून निघण्याचे आवाहन केले आहेय..
प्रशासन वेळोवेळी चायना मांजा वापरण्यापासून आणि वाचण्यासाठी आवाहन करत आहे. तरी सुद्धा बाजारात हा जीवघेणा मांजा मिळतो, आणि पतंग उडवणारे शौकीन आवडीने हा मांजा घेतात, पण आपण ज्या मांजाने आपण आनंदात पतंग उडवतो तो मांजा कुणाचा जीव घेईल याची जराही कल्पना पतंग शौकिनांना नसेल का? पैसे कमावण्यासाठी चायना मांजा विक्री करणारा मृत्यू विकतोय पैश्यांच्या लालसेपोटी त्याच्या डोळ्यांवर पडदा पडला असेल पण, पतंग उडवणाऱ्यांनी तरी याच भान ठेवायला हवं.
दरम्यान, प्रशासन चायना मांजा बंदीवर कडक कारवाई करताना दिसतात, मात्र तरी सुद्धा हा मांजा मिळतो कसा ? मग कारवाई कुणावर होतेय, चायना मांजा विक्रीला ढील कुणाची आहे, असा प्रश्न यावेळी उपस्थित होतोय.