चंद्रपूरच्या बल्लारशाह वनपरिक्षेत्रात बांबू निष्कासनाचं काम करणाऱ्या वनमजुरावर वाघानं हल्ला करून त्याला ठार मारलं. वाघ मृतदेहाजवळ ठाण मांडून बसला होता आणि त्याला हटवण्याच्या प्रयत्नांना हल्ल्याचा प्रत्युत्तर देत होता. शेवटी त्याला बेशुद्ध करून जेरबंद केलं. देसाईगंजशेजारील वडसा भागातही वाघानं शेतकऱ्यावर हल्ला केला.
लालसिंग बरेलाल मडावी (५७), असे वाघाच्या हल्ल्यात ठार वनमजुराचे नाव आहे. मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्याच्या बिछाया तालुक्यातील बेहराटोला येथील मूळ रहिवासी असलेले लालसिंग हे बांबू युनिट पाचमध्ये काम करण्यासाठी आले होते. राखीव वन खंड क्रमांक ४९३मध्ये काम सुरू असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. इतर वनमजुरांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. हल्लेखोर वाघ लालसिंग यांच्या मृतदेहाजवळ बसून होता. त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला असता वनाधिकाऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न करीत होता. दुपारी ४ वाजतापर्यंत वाघ मृतदेहापासून लांब जात नसल्याने अडचण वाढली. शेवटी बल्लारपूरच्या अतिशीघ्र दलाला पाचारण करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडचलवार यांच्या नेतृत्त्वात शूटर अविनाश फुलझले यांनी वाघाला ट्रँक्विलाइज केले. नंतर तपासणी करून चंद्रपूर वन्यजीव उपचार केंद्रात पाठविण्यात आले. राजुरा येथील उपविभागीय वनाधिकारी पवनकुमार जोंग व सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्राधिकारी नरेश भोवरे यांनी चमूसह ही कारवाई केली.
व्याघ्रहल्ल्यात शेतकरी जखमी
गडचिरोली : देसाईगंज शहरालगत असलेल्या जुन्या वडसा भागात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून शेतकऱ्याला जखमी केले. गणपत नखाते, असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. चंद्रपूरनंतर गडचिरोली जिल्ह्यातही वाघाचे हल्ले वाढल्याने उपाय योजण्याची गरज व्यक्त होत आहे.