Mahayuti Will Fight Together In Local Elections: भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगलं यश मिळवण्याचा आमचा संकल्प आहे. पण, आम्ही महायुती म्हणूनच या निवडणुकांना सामोरे जाऊ, असं बावनकुळे यांनी सांगितलं आहे.
शिर्डी येथे भाजपचे प्रदेश अधिवेशन आज, रविवारी होत आहे. त्यासाठी पक्षाचे सर्व पदाधिकारी शिर्डीत दाखल झाले आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीच्या काही घटकपक्षांकडून स्वबळावर निवडणुका लढविण्याचे संकेत दिले जात असताना बावनकुळे यांनी मात्र महायुती एकत्र लढणार असल्याचे म्हटले आहे.
बावनकुळे म्हणाले, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी संघटन मजबूत करून दीड कोटी सदस्य संख्या आम्ही गाठणार आहोत. आमची निवडणुकीची तयारी असली, तरी महायुती म्हणून निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत. शिर्डी येथे होत असलेले अधिवेशन ऐतिहासिक आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीत जनतेने २३७ संख्याबळ असलेले फडणवीस सरकार निवडून दिल्याबद्दल जनतेचे व कार्यकर्त्यांचेही आभार मानणार आहोत. कार्यकर्त्यांचा सन्मानही केला पाहिजे, यासाठी हे आधिवेशन महत्त्वपूर्ण आहे.’
या वेळी प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, महामंत्री विजय चौधरी, पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आदी उपस्थित होते.
शिर्डीत आजपासून भाजपचे प्रदेश अधिवेशन
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अधिवेशन आज, रविवारी (दि. १२) शिर्डी येथे होत आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्ष्राचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. राज्यात सत्ता आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी; तसेच पक्षांतर्गत बदलासाठीही हे अधिवेशन महत्त्वाचे मानले जात आहे. यासाठी शिर्डीत जय्यत तयारी करण्यात आली असून, १५ ते २० हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. राज्यातील पक्षाचे बहुतांश मंत्री शनिवारीच शिर्डीत दाखल झाले आहेत.
आज, रविवारी सकाळी नड्डा यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. दिवसभर विविध सत्र होणार आहेत. त्यानंतर सायंकाळी गृहमंत्री शहा यांच्या उपस्थितीत सांगता होईल. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहा काय सूचना करतात, याकडे लक्ष लागले आहे. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या देखरेखीखाली अधिवेशनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिर्डीत सर्वत्र पक्षाचे झेंडे, स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. शिर्डीतील प्रसादालयाशेजारील पटांगणावर मंडप उभारला आहे. भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून, पदाधिकारी, मंत्री यांच्यासह सुमारे ५० जण व्यासपीठावर बसतील अशी व्यवस्था आहे. शहा आज, रविवारी दुपारी येणार असून, दुपारी शनिशिंगणापूर येथे जाऊन शनीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर शिर्डीत साईबाबांचे दर्शन आणि अधिवेशनाच्या सांगतेला उपस्थित राहणार आहेत. सर्वच मंत्र्यांचे शनिदर्शन आणि साईदर्शनाचे नियोजन आहे.पहिल्या सत्राला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या भाषणाने सुरुवात, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणाने सांगता होईल. दुसऱ्या सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करतील.