• Sat. Jan 11th, 2025

    पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून विभागाचा आढावा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 11, 2025
    पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून विभागाचा आढावा – महासंवाद

    छत्रपती संभाजीनगर,दि. 11 : राज्यातील पशुसंवर्धन विभागातील योजनांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे सांगितले. पर्यावरण विभागातील कामांमध्ये लोकसहभाग घेत पर्यावरणपूरक वातावरणासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

    जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री पंकजा मुंडे यांनी आज मराठवाडा विभागातील पशुसंवर्धन व प्रदुषण नियंत्रण मंडळ विभागाचा आढावा घेतला. यावेळी पशुसंवर्धन आयुक्त प्रवीणकुमार देवरे, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, खाजगी सचिव मंदार वैद्य, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक पशुसंवर्धन सहायुक्त गणेश देशपांडे, लातूर प्रादेशिक पशूसंवर्धन सहायुक्त राजकुमार पडीले, शासकीय गोठीत रेतमात्रा निर्मिती केंद्राचे विभागीय व्यवस्थापक डॉ प्रशांत चौधरी  तसेच  मराठवाडा विभागातील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व जिल्हा  पशूसंवर्धन अधिकारी उपस्थित होते.

    मराठवाडयातील विभागाची वाटचाल, विभागाची ध्येय धोरणे, विभागातील पशुधन, 21 वी पशुगणना, राज्य व केंद्र पुरस्कृत योजना, दुभत्या जनावरांसाठी खाद्य सुधारणा कार्यक्रम, वैरण विकास कार्यक्रम,  पशुरोग नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत लसीकरण, जिल्हा निहाय पशुधन नोंदणी, गोवर्धन गोवंश सेवा केंद्र,स्मार्ट योजना, एकात्मिक सर्वेक्षण योजना पशुगणना, जिल्हा वार्षिक योजने अंतर्गतच्या योजना, दुग्ध विकास प्रकल्प, पुशपालनासाठी शेतकऱ्यांना सुलभ वित्त पुरवठा, दुध संकलनाचे जाळे तयार करणे, चारा निर्मितीत स्वंयपूर्ण होणे आदीसह विभागाचा आढावा घेत पशुसंवर्धन विभागातील योजनांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील तसेच देशी देवणी गोवंश संवर्धन व जतन प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही मंत्री मुंडे म्हणाल्या.

    शेतकरी बांधवांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विभागातील प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. देशातील ज्या राज्यात पशुसंवर्धनात पथदर्शी काम झाले तेही काम आपल्यासाठी दिशादर्शक ठरेल. तालुका पातळीवरील पशुवैद्यकीय दवाखाने तसेच पदभरती याबाबतही प्रस्ताव तातडीने सादर करा, असे निर्देशही त्यांनी सबंधित यंत्रणेला दिले. मुख्यमंत्री पशुसंस्थे योजनेअंतर्गत सर्व तालुक्यांसाठी मोबाईल व्हॅन देण्याविषयी सकारात्मक चर्चाही यावेळी झाली.

    पर्यावरण विभागातील कामांमध्ये लोकसहभाग घेत  पर्यावरणपूरक वातावरणासाठी विशेष प्रयत्न करणार

    प्रदुषण नियंत्रण मंडळा अंतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम, भविष्यातील ध्येय धोरणे, घनकचरा व्यवस्थापन, पाणी, हवा प्रदुषण, नदी व तलाव संवर्धन, पर्यावरण जतन व संवर्धन जनजागृती राज्यातील पर्यावरण विभागातील कामांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. पर्यावरण विभागातील कामांमध्ये लोकसहभाग घेत  पर्यावरणपूरक वातावरणासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.

    मराठवाडा विभागातील घनकचरा व्यवस्थापन, पाणी, हवा प्रदूषण नियंत्रण, नदी व तलाव संवर्धन, पर्यावरण जतन व  संवर्धन जनजागृतीपर उपक्रम, राज्यस्तरीय नदी संवर्धन योजना, प्लॅस्टीक निर्मुलन, नदी संवर्धन योजना, पर्यावरणपूरक वातावरणासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करणे, जैविक कचरा नियमावली, पर्यावरण  जतन व संवर्धनासाठी कामाचे बारकाईने  नियोजन करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी सबंधित विभागातील अधिकाऱ्यांना दिले.

    यावेळी बैठकीला प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी मनिष होळकर, उपप्रादेशिक अधिकारी अच्युत नांदवटे, वरिष्ठ वैज्ञानिक शांतीलाल नागरे यासह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

    यावेळी उपस्थित अधिकारी यांनी विभागाच्या योजना, सद्यस्थिती व भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर माहितीचे सादरीकरण केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed