• Sun. Jan 19th, 2025

    कर्नाक पूल लांबणीवर? मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉकच्या मंजुरीची मुंबई महापालिकेला प्रतीक्षा

    कर्नाक पूल लांबणीवर? मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉकच्या मंजुरीची मुंबई महापालिकेला प्रतीक्षा

    Carnac Bridge Mumbai: दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, सीएसएमटी आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे मुंबई महापालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे.

    महाराष्ट्र टाइम्स
    carnac bridge

    मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळील पी. डिमेलो मार्गाला जोडणाऱ्या १५४ वर्षे जुन्या कर्नाक पुलाची मुंबई महापालिकेकडून पुनर्बांधणी सुरू आहे. दुसरा गर्डर बसवून उड्डाणपूल ५ जून २०२५पर्यंत खुला करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी महापालिकेने मध्य रेल्वेकडे १८ आणि १९ जानेवारीला मेगाब्लॉक मागितला आहे. त्याच्या मंजुरीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मंजुरी मिळाली नाही, तर अंतिम मुदत हुकण्याची शक्यता महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तवली आहे.

    दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, सीएसएमटी आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे मुंबई महापालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी डिसेंबरमध्ये या कामाची पाहणी करून आढावाही घेतला. या पुलाच्या दुसऱ्या बाजूच्या गर्डरचे ४२८ मेट्रिक टन वजनाचे सुटे भाग प्रकल्पाच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. १३ जानेवारी २०२५ पर्यंत गर्डरच्या सुटे भागांचे जोडकाम केल्यानंतर, १८ आणि १९ जानेवारीला मध्य रेल्वे प्रशासनाकडे ब्लॉक मिळण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. ब्लॉक उपलब्ध होताच १९ जानेवारीपर्यंत गर्डर स्थापित करण्याची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे.
    Delhi-Mumbai Expressway: ‘समृद्धी’ने जोडली दिल्ली; ४.२ किमीचा आमने ते बडोदा-मुंबई द्रुतगती मार्ग पूर्ण
    त्यानंतर पुलाच्या पूर्व आणि पश्चिम दिशेकडील पोहोचमार्गाच्या बांधणीसाठी खांब बांधणीचा पहिला टप्पा १५ मार्चपर्यंत पूर्ण केला जाईल. त्यानंतर ३ मे पर्यंत पोहोच रस्त्यांचे काँक्रीटीकरण आणि १ जूनला लोड चाचणी करण्याचे नियोजन केले आहे. ही सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर ५ जून २०२५ पर्यंत कर्नाक पूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. मात्र त्याआधी १८ आणि १९ जानेवारीला मध्ये रेल्वेकडून ब्लॉक मंजूर होणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेकडून मध्ये रेल्वेकडे पाठपुरावाही केला जात आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर क्रॅश बॅरियर्स, वीजेचे खांब उभारण्याकामी होणारा वेळ टाळण्यासाठी ही कामे समांतरपणे पूर्ण केली जाणार आहे. मात्र मंजुरी न मिळाल्यास आणि ब्लॉकची तारीख पुढे गेल्यास अंतिम मुदतही पुढे जाईल, अशी माहिती देण्यात आली.
    Ladki Bahin Yojana:लाडकी बहीण योजनेचा लाभ हवाय? नव्याने नावनोंदणी करता येणार? योजनेबाबत मोठी अपडेट
    गोखले पूलही विलंबाने
    अंधेरी पूर्व आणि पश्चिम दिशेच्या वाहतुकीदरम्यान महत्त्वाचा दुवा असलेल्या गोखले पुलाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. पुलाचा हा भाग २६ फेब्रुवारी २०२४ पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. आता या पूल उभारणीतील महत्त्वाचा टप्पा, म्हणजे दुसरा गर्डर स्थापन करण्याचे काम झाले असून उर्वरित कामे पूर्ण करून पूर्व ते पश्चिम जाणारा मार्ग एप्रिल २०२५ मध्ये खुला केला जाणार होता. तर याच दरम्यान बर्फीवाला पुलाचीही आणखी एक बाजू खुली करण्याचे नियोजन आहे. मात्र या पुलाची अनेक कामे बाकी असून आणखी पंधरा दिवस ते एक महिने मुदत पुढे जाण्याची शक्यता आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed