Anjali Damania Meets CM Devendra Fadnavis: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरले आहे. तर त्यांनी हत्येसंदर्भात अनेक दावे करत धनंजय मुंडेंना घेरले आहे. याचसंदर्भात दमानियांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे आणि पाच मागण्या केल्या आहेत.
अंजली दमानिया म्हणाल्या, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एसआईटी रद्द करण्यात यावी, बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसाठी हॉटलाइन बनवण्यात यावी. तसेच मला बीडमधून तक्रारींचे अनेक कॉल्स येत आहेत. त्यासाठी यावर तक्रार नोंद करून घ्यावी. बीडमधल्या शस्त्र परवाने तपासण्यात यावेत, अशा मागण्या मी केल्या आहेत. अंजली दमानिया यांनी आधीपासूनच याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भातच त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बीडमधील वाढती गुन्हेगारी व त्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल चर्चा केली आहे.
यासोबतच दमानियांनी आणखी काही मागण्या केल्या आहेत. त्या म्हणजे, ‘हत्याप्रकरणाची सर्व चौकशी ऑन कॅमेरा घेण्यात यावी. वाल्मिक कराड राहत असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात यावा. बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची नेमणूक बिंदू नामावलीप्रमाणे झाली आहे का याची चौकशी व्हावी. तसेच, बीड जिल्ह्यातील बिना नंबर प्लेटची वाहनं ताब्यात घ्यावी.’ तर दमानियांनी असेही सांगितले की, ‘मुख्यमंत्र्यांनी मला जॉईंट सीपी क्राईम आणि मुंबई पोलीस आयुक्तांना तक्रार देण्यास सांगितले आहे.’
दरम्यान दमानियांनी यापूर्वी केलेल्या आरोपांची पुन्हा री ओढली आहे. ‘वाल्मिक कराडच्या नावावर अनेक बार आहेत. कायदा धाब्यावर बसवून हे परवाने देण्यात आले आहेत, असा आरोप करत त्यांनी यावर सखोल चौकशी आणि कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीत त्यांनी याबाबत सविस्तर चर्चा केली असल्याचे सांगितले.