• Wed. Jan 8th, 2025
    हजारो मैलांचा प्रवास करुन ‘तो’ महाराष्ट्रात आलाय,दुर्मिळ म्हणून खास ठरलाय…

    | Contributed byआशिष मोरे | | Updated: 4 Jan 2025, 11:16 am

    Chandrapur News:ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या ईरई धरण परिसरात दुर्मिळ असलेला अल्बिनो गढवाल बदक दिसून आला आहे. या दुर्मिळ बदकाला बघण्यासाठी पक्षीमित्र गर्दी करीत आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    निलेश झाडे, चंद्रपूर :चंद्रपूर म्हटलं की वाघ डोळ्यांसमोर उभे राहतात. वाघ ही जरी चंद्रपूरची ओळख झाली असली तरी येथील वन क्षेत्रात अतिशय दुर्मिळ वन्यजीवांचा अधिवास आहे.अश्यात वन्यजीव प्रेमिंना सुखाविणारी घटना येथे घडली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या ईरई धरण परिसरात दुर्मिळ असलेला अल्बिनो गढवाल बदक दिसून आला आहे. या दुर्मिळ बदकाला बघण्यासाठी पक्षीमित्र गर्दी करीत आहेत.

    घनदाट जंगल, धरण, नदी नाले आणि मुबलक प्रमाणात असलेले पाणवटे विदेशी स्थलांतरित पक्ष्यांना चंद्रपुरात येण्यासाठी आकर्षित करीत असतात. दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणात विदेशी स्थलांतरित पक्षी येत असतात.
    यावर्षी हजारो कि.मी.चा प्रवास करीत त्यांनी चंद्रपूर गाठले आहे.विदेशी स्थलांतरित पक्ष्यांमध्ये मोठी लालसरी, चक्राग बदक, चक्र‌वाक, काणुक बदक,भुवयी बदक, गढवाल, तलवार बदक यांचा समावेश आहे. मात्र चर्चा होत आहे ती दुर्मिळ अल्बिनो गढवाल या बदकाची.

    हा बदक ईरई धरण परिसरातील काटवल तुकूम तलावात आढळून आला आहे. गढवाल (Anas Strepera) हा बदकापेक्षा लहान असतो. त्याच्या पोटाचा भाग पांढरा, शेपटी काळीभोर असते. पंखावरती पांढरा डाग असतो. त्याच्या पंखांची काळी किनार, तो उडताच ठळकपणे दिसून येते. गढवाल हे युरोप आणि उत्तर अमेरिका या भागांतून स्थलांतर करून येतात. अल्बिनो पक्ष्यांचे पंख कमकुवत असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

    albino gadhvali duck

    अल्बिनो पक्षी फार काळ जगत नाही. साधारणतः अशा प्रकारचे पक्षी किंवा प्राणी निसर्गात क्वचितच आढळतात. कारण त्यांच्या पांढऱ्या रंगामुळे ते लवकर भक्ष्य बनतात. अतिनील विकिरणांपासुन संरक्षण नसल्यामुळे भक्षकांपासुन दुर राहण्यासाठी क्षमता नसल्याने अल्बिनोचा जगण्याचा सरासरी कालावधी कमी असतो.अशी माहिती प्राणीशास्त्र संशोधन अभ्यासक शुभम संजय आत्राम यांनी दिली. शुभम संजय आत्राम (पक्षी संशोधन अभ्यासक),प्रा.डॉ. नरेंद्र हरणे, सुमेध वाघमारे, ,डॉ.हर्षद मटाळे‌,‌सुलेमान बेग यांना पक्षी निरीक्षणात दुर्मिळ अल्बिनो गढवाल आढळून आला.
    दुर्मिळ असलेला पक्षी दिसल्याने चंद्रपूरच्या पक्षीप्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed