Sanjay Raut Tweets Walmik Karad Photo: बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच खासदार संजय राऊतांनी आता वाल्मिक कराडांचा एक कथित फोटो एक्स हँडलवर ट्विट केला आहे आणि वादाची तार छेडली आहे.
खासदार संजय राऊतांनी एक्स हँडलवर वाल्मिक कराडांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत फोटो असणारा खंडणीखोर गावगुंड (वाल्मिक कराड) पोलिसांना सापडत नाही. एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी किती पारदर्शक होईल? हाय का नाही मोठा जोक?’ तर राऊतांनी या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ‘व्वा! क्या सीन है?? नक्की कोण कुणाचा आका?’ असे लिहत सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान संतोष देशमुख हत्येप्रकरणी सीआयडीच्या तपासाची चक्र वेगाने फिरु लागली आहेत. मात्र आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. या हत्येप्रकरणी चर्चेत असलेले वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ते गेल्या २२ दिवसांपासून फरार आहेत. वाल्मिक कराड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचा आरोप केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाल्मिक कराडसह इतर आरोपींची संपत्ती जप्त करण्याचेही आदेश दिले आहेत.