Pune News: पुण्यात पब संस्कृतीचा एक कारनामा समोर आला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पबकडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आले आहेत.
दरम्यान तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सुरक्षेसाठी कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देणार असल्याचा दावा पबने केला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे या प्रकाराची पुणे पोलीस आयुक्तांकडे पत्र लिहित तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनीही या प्रकाराची माहिती घेतली असून कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
नेमकं घडलं काय?
पुण्यातील मुंढवा येथील हाय स्पिरिट कॅफे या रेस्टॉरंट कम पबने नववर्षानिमित्त नियमित ग्राहक असलेल्या तरुणांना निमंत्रण पाठवले. तर निमंत्रणासह कंडोमच्या पाकीट आणि इलेक्ट्रा ओआरएस वितरित केले. यानंतर युवक काँग्रेसने या प्रकाराचा विरोध करत पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आणि ‘हे कृत्य पुणे शहराच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेला न शोभणारे आहे,’ असे पत्रात म्हटले.
युवक काँग्रेसच्या पत्रात असेही नमूद केलेय की, अशा कृतींमुळे तरुणांमध्ये चुकीचे संदेश पोहोचण्याची भीती आहे. तर समाजात गैरसमज आणि चुकीच्या सवयी रुजण्याचाही धोका आहे.’ परंतु पोलिस अधिकाऱ्यांनी कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचे सांगत तक्रार नोंदवण्यास नकार दिला आहे.