Chhatrapati Sambhaji Raje on Dhananjay Munde: ‘संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली, महाराष्ट्रामध्ये भीषण परिस्थिती झाली आहे, मला बोलायला लाज वाटते महाराष्ट्राचे बीड झालं आहे, १९ दिवस झाले अजून अटक नाही, वाल्मिक कराड बेपत्ता आहे’, असा घणाघात छत्रपती संभाजीराजे यांनी केला. त्यांनी आरोपी अटक होत नसल्याने संताप व्यक्त केला.
हायलाइट्स:
- धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या
- छत्रपती संभाजीराजे यांची मागणी
- बीड पॅटर्नबाबत केले मोठे विधान
यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली. अजित दादा परखड म्हणता मग त्यांना संरक्षण देताय, ते तुम्हाला पटतंय का, असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्रात काय चालले आहे, असा प्रश्न त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे कौशल्य दाखवा, खऱ्या आरोपीला अटक करून दाखवा. कराड याला संरक्षण देणारे तिथले मंत्री यांची हकालपट्टी का झाली नाही? त्यांचा राजीनामा का घेतला नाही? हा आमचा सवाल आहे, असे ते म्हणाले. या मोर्चाला जातीय वळण नाही, हा सर्वधर्मीय मोर्चा आहे, असे त्यांनी वक्तव्य केले.
अशी प्रकरण राज्याला परवडणारे आहे का, असा सवालही राजेंनी यावेळी केला. स्वत: पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत वाल्मिक शिवाय धनंजय मुंडे यांचे पान हलत नाही. बीडमध्ये जे चाललं आहे ते तुम्हाला पटते का. बीडची गुन्हेगारी पाहून मी चकित झालो, स्वत: मुंडे यांचा हातात बंदुक घेऊन फोटो आहे, हे काय दहशत माजवण्याचा प्रकार आहे का? त्यांना मंत्रिपद देऊ नका असे माझे म्हणणे होते. धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड कुठं आहे हे माहिती नसणे हे पटणारे नाही. मुंडेंचा राजीनामा घ्यायलाच हवा, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली.

