• Wed. Dec 25th, 2024

    पर्यावरण व वातावरणीय बदल याबाबतच्या योजनांचा नियोजित आराखडा तयार करा – मंत्री पंकजा मुंडे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Dec 24, 2024
    पर्यावरण व वातावरणीय बदल याबाबतच्या योजनांचा नियोजित आराखडा तयार करा – मंत्री पंकजा मुंडे – महासंवाद

    मुंबई,दि. 24 : पर्यावरण व वातावरणीय बदल याबाबत राबविण्यात येणाऱ्या योजना, भविष्यातील ध्येय धोरणे, घनकचरा व्यवस्थापन, माझी वसुंधरा अभियान, पाणी, हवा प्रदूषण, नदी व तलाव संवर्धन, पर्यावरण जतन व संवर्धन जनजागृती उपक्रमांविषयी सुनियोजित आराखडा तयार करण्याच्या सूचना पर्यावरण आणि वातारवणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी  सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या.

    मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, राज्यातील घनकचरा व्यवस्थापन, पाणी, हवा प्रदूषण नियंत्रण, नदी व तलाव संवर्धन, पर्यावरण जतन व  संवर्धन जनजागृतीपर उपक्रम, राज्यस्तरीय नदी संवर्धन योजना, सागर तटीय विशेष राखीव क्षेत्र नियमन, स्थानिक स्वराज्य संस्थाचे घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टीक निर्मुलन, राज्य नदी संवर्धन योजना, महाराष्ट्र पर्यावरण माहिती प्रणाली केंद्र, सृष्टी मित्र पुरस्कार, माझी वंसुधरा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणे, पर्यावरणपूरक वातावरणासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करणे, जैविक कचरा नियमावली, पर्यावरण  जतन व संवर्धनासाठी राज्य, जिल्हा व ग्रामपातळीवर समित्या कार्यरत करणे, पर्यावरण क्लब स्थापन करणे. पाणथळ जागांचे संवर्धन यासाठी विशेष प्रयत्न करणे याबाबत सविस्तर नियोजन करण्यात यावे. त्यानुसार राज्यातील पर्यावरण विभागातील कामांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील.

    पशुसंवर्धन विभागातील योजनांना गती देणार

    राज्यातील पशुसंवर्धन विभागाचाही यावेळी श्रीमती मुंडे यांनी आढावा घेतला. विभागाची स्थापना आणि वाटचाल, विभागाची ध्येय धोरणे, राज्यातील पशुधन, राज्य व केंद्र पुरस्कृत योजना, एकात्मिक सर्वेक्षण योजना पशुगणना, जिल्हा वार्षिक योजना, विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ यासह राज्यातील पशुसंवर्धन विभागातील योजनांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील.

    यावेळी बैठकीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिध्देश कदम, पशुसंवर्धन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे यासह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

    यावेळी उपस्थित अधिकारी यांनी विभागाच्या योजना, सद्यस्थिती व भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर माहितीचे सादरीकरण केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed