• Tue. Dec 24th, 2024
    डम्परखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचं श्वासपटल फाटलं, ससूनमध्ये ४ तास ऑपरेशन, आता…

    Pune Dumper Accident :अपघातामध्ये डंपरची जोरात धडक बसल्याने पवार यांचे श्वासपटल फाटून ते छातीमध्ये गेले. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते

    Pune Accident : डम्परखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचं श्वासपटल फाटलं, ससूनमध्ये ४ तास जिकिरीची शस्त्रक्रिया, आता…

    पुणे : वाघोली येथील अपघातामध्ये जानकी पवार (वय १९) यांचे श्वासपटल (डायफ्राम) फाटल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. श्वासपटल फाटल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. अशा स्थितीत त्यांना सोमवारी पहाटे तीन वाजता ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांनी चार तास शस्त्रक्रिया करून श्वासपटल पुन्हा जोडले. जानकी पवार यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

    कसा झाला अपघात?

    अपघातामध्ये डंपरची जोरात धडक बसल्याने पवार यांचे श्वासपटल फाटून ते छातीमध्ये गेले. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. सोमवारी सकाळी सात वाजता शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली, ती अकरा वाजता संपली. त्यानंतर पुढील अतिदक्षता उपचारांसाठी त्यांना विभागात दाखल करण्यात आले असून, व्हेंटिलेटरच्या मदतीने उपचार सुरू आहेत. अतिदक्षता विभागात पुढील २४ तास त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वॉर्डमध्ये दाखल करायचे की नाही, हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे ‘ससून’ च्या डॉक्टरांनी सांगितले.

    जानकी पवार यांच्यासह अपघातामध्ये जखमी झालेल्या सहा जणांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्वांना सोमवारी पाहाटे तीनच्या सुमारास दाखल करण्यात आले. अलिशा पवार (वय २५, रा. अमरावती) यांच्या दोन्ही पायांना मुका मार लागला आहे. नागेश पवार (वय २०) यांच्या छाती आणि पोटाला जखम झाली असून, डाव्या हाताचे हाड तुटले आहे. रेनिशा पवार (वय १८) यांच्या ओटीपोटाजवळील हाड (पेल्विस) तुटल्याने रक्तस्राव झाला आहे. रोशन भोसले (वय ७. रा. अमरावती) याच्या उजव्या पायाचे हाड तुटले आहे. सुदर्शन वैराळ (वय १८, रा. संगमनेर) याच्या उजव्या पायाचे हाड तुटले आहे.
    Pune Dumper Accident : डम्परखाली नऊ जणांना निर्दयीपणे चिरडलं, वाघोलीत काळोख्या रात्री काय घडलं? पुणे पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
    सोमवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास जानकी पवार यांच्यावरील शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. सर्जरी विभागाच्या प्राध्यापक डॉ. लता भोईर आणि त्यांच्या यांच्या पथकाने शस्त्रक्रिया केली. पवार यांच्यावर ‘ट्रॉमा विभागा’त उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

    सहा जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. तीन रुग्ण अस्थिरोग विभागात असून, तिघे शस्त्रक्रिया विभागात दाखल आहेत. श्वासपटल फाटलेल्या जानकी पवार यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
    – डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, बीजे वैद्यकीय महाविद्यालय
    Pune Accident : अमरावतीहून आले, पोटच्या दोन लेकरांचा डोळ्यादेखत चिरडून मृत्यू, माऊलीचा हंबरडा, पुण्याच्या काळजाचं पाणीपाणी

    गंभीर दुखापतींमुळे मृत्यू?

    अपघातामध्ये वैभव पवार (वय २), वैभवी पवार (वय एक) आणि विशाल पवार (वय २२ वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पोटावरून किंवा कमरेवरून डंपरचे चाक गेल्याने विविध अवयवांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ‘ससून’मध्ये आण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचेही डॉक्टरांनी स्पष्ट केले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed