Pradhan Mantri Kisan Samman Nidhi : ‘राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत आता वर्षाला पंधरा हजार रुपये देण्यात येणार आहेत,’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पुण्यात केली.
शेतकरी सन्मान दिनानिमित्त कृषी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या कल्याणावर भर देत असून, अडचणीच्या काळात बळीराजाला आर्थिक मदत म्हणून त्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात, तर या योजनेच्या लाभार्थ्यांना राज्य सरकारकडूनही ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. दोन्ही योजना मिळून आता शेतकऱ्यांना एकूण पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे,’ असे त्यांनी सांगितले.
Ladki Bahin Yojana: नवीन वर्षात मिळणार डिसेंबरची ‘ओवाळणी’? सरकारच्या निर्णयाकडे लाडक्या ‘बहिणी’चं लक्ष
‘शाश्वत शेतीसाठी पारंपरिक शेती आणि आधुनिक विज्ञानाची सांगड घालणे आवश्यक आहे; तसेच रसायनांचा वापर टाळून विषमुक्त नैसर्गिक शेतीचा अवलंब केला पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर आगामी तीन वर्षांत २५ लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्यासाठी राज्य सरकारकडून नैसर्गिक शेती मोहीम राबविण्यात येत आहे. छोट्या शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण परवडावे, यासाठी गट शेती, अवजारांची बँक, शाश्वत सिंचनासाठी मागेल त्याला शेततळे, शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडण्यासाठी ॲग्री बिझनेस सोसायटी आदी योजना-उपक्रम राबविण्यात येत आहेत,’ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.