• Sat. Dec 28th, 2024
    मॉडेलसह तिघांनी चित्रपट निर्मात्याला घातला लाखोंचा गंडा, घटनेनं खळबळ; प्रकरण काय?

    Nagpur Crime News : चित्रपटासाठी ३०० कोटी रुपये कर्ज उपलब्ध करून देण्याच्या बहाण्याने मॉडेलसह तिघांनी चित्रपट निर्मात्याला ३० लाखांनी गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स

    म.टा.प्रतिनिधी, नागपूर : चित्रपटासाठी ३०० कोटी रुपये कर्ज उपलब्ध करून देण्याच्या बहाण्याने मॉडेलसह तिघांनी चित्रपट निर्मात्याला ३० लाखांनी गंडा घातला. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नीलम धनराज शिव वय ३० रा.गोकुलपेठ, दिलीप पांडुरंग वानखेडे वय ५० व शुभम दिलीप वानखेडे वय ३० दोन्ही रा. गजानननगर,अकोला,अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

    अमित परमेश्वर धुपे वय ४४ रा. रडके ले-आउट, हिंगणा रोड, एमआयडीसी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला. धुपे यांचे रामनगर चौकातील तिरुपती इन्क्लेव्ह येथे सेव्हन हॉर्स इंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड नावाचे कार्यालय आहे.
    कल्याणमध्ये मराठी भाषिकांना मारहाणीचे प्रकरण, आरोपीने अखेर दिले स्पष्टीकरण; म्हणाला, ‘माझ्या बायकोला शिवीगाळ…’
    धुपे यांना व्यवसायासाठी भांडवलाची गजर असल्याने बँकेतून कर्ज काढण्याच्या प्रयत्नात आहेत. सहा महिन्यांपूर्वी मॉडेल नील ही धुपे यांच्या कार्यालयात आली. त्यांनी तिला कर्जाची आवश्यकता असल्याचे सांगितले. माझे सहकाऱ्यांची शासकीय बँकेत चांगली ओळख असून राजकीय नेत्यांसोबतही त्यांचे संबंध आहेत. ते तुम्हाला चित्रपट निर्मितीसाठी ३०० कोटी रुपयांचे खासगी कर्ज उपल्बध करून देतील, असे ती धुपे यांना म्हणाली. तिने तिच्या मोबाइलमध्ये नेत्यांसोबतचे छायाचित्र दाखवून धुपे यांचा विश्वास संपादन केला. १४ सप्टेंबर २०२४ ला ती दिलीप पांडुरंग वानखेडे याच्यासोबत कार्यालयात आली. माझा मुलगा अकोल्यातील पंजाब नॅशनल बँकेत विभागीय व्यवस्थापक आहे, दिलीप याने धुपे यांना सांगितले. तुम्हाला क्रेडिट गॅरंटी फन्ड ट्रस्ट मायक्रो अँड एन्टरप्रायजेस (सीजीटीएमएस) या योजनेंतर्गत आठ दिवसांत दोन कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देऊ शकतो. यासाठी तुम्हाला काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही.त्यासाठी मला ४० लाख रुपये प्रक्रिया शुल्क द्यावे लागेल,असे दिलीप धुपे यांना म्हणाला.

    मी सध्या ३० लाख रुपयांची व्यवस्था करून शकतो. कर्ज मंजूर झाल्यानंतर उर्वरित दहा लाख रुपये देईल, असे धुपे त्याला म्हणाले. त्यानंतर १८ सप्टेंबरला नीलम व धुपे हे दिलीपच्या अकोला येथील घरी गेले. तेथे शुभम याच्यासोबत भेट झाली. त्यानेही कर्ज मिळवून देण्याचे आमिष दिले. ३ ऑक्टोबरला धुपे यांनी लेखी करारनामा केला. त्याचदिवशी धुपे यांनी दिलीपच्या नाशिक येथील खात्यात पाच लाख व नंतर काही दिवसांत एकूण ३० लाख रुपये जमा केले. मात्र त्यानंतर धुपे यांना कर्ज मिळाले नाही. तिघांनी त्याच्यासोबत बोलायचे टाळले. १९ डिसेंबरला सकाळी ११ वाजता दिलीपने धुपे यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. ‘मेरे से दुश्मनी करना महेंगा पडेगा’, असे तो म्हणाला. याचदरम्यान नीलमनेही धुपे यांना पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली. फसवणूक झाल्याने धुपे यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed