• Mon. Jan 6th, 2025

    प्रवासी बोटीच्या अपघाताबाबत विधानपरिषदेत निवेदन

    ByMH LIVE NEWS

    Dec 20, 2024
    प्रवासी बोटीच्या अपघाताबाबत विधानपरिषदेत निवेदन




    नागपूर, दि. 20 : मुंबई शहराजवळ अरबी समुद्रातील बुचर आयलँडनजिक नीलकमल कंपनीच्या एका प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याची घटना १८ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३.५५ च्या सुमारास घडली. या बोटीतील एकूण ११० प्रवाशांपैकी ९६ प्रवाशांना सुरक्षित वाचविण्यात आले असून अद्याप शोधकार्य सुरू असल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली.

    मुंबईतील बोट दुर्घटनेप्रकरणी विधानपरिषदेत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, नौदलाचे व्हाईस अॅडमिरल संजय जगजित सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, नौदलाच्या डॉक्टरांनी आतापर्यंत 13 जणांना मृत घोषित केले आहे. आतापर्यतच्या माहितीनुसार मृतामध्ये नौदलाचे 3 तर 10 नागरिक आहेत. 3 गंभीर जखमींना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात एक 4 वर्षाची मुलगी व एक 8 महिन्यांची गरोदर महिला आहे. दोघांची प्रकृती स्थिर आहे. नौदलाचा एक जवान सुध्दा गंभीर असून उपचार घेत आहे.

    प्रसंगाचे गांर्भीय लक्षात घेता नौदल, कोस्टगार्ड, मुंबई पोलीस यांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले. या बचाव कार्यात नौदलाचे 11 क्राफ्ट आणि 4 हेलिकॉप्टर्सची मदत घेण्यात आली. अद्यापही शोधकार्य सुरुच आहे. अजूनही 8 क्राप्ट, 1 कोस्टगार्ड वेसल आणि एका हेलिकॉप्टरच्या मदतीने शोधकार्य सुरुच आहे.

    मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.

    अपघातग्रस्त बोटीस धडक देणाऱ्या भारतीय नौदलाच्या स्पीड बोटचा चालक व इतर जबाबदार व्यक्ती यांच्याविरुध्द गुन्हा क्र. ०२८३ दि. १८.१२.२०२४ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०६(१), १२५(a). १२५ (७), २८२, ३२४(३), ३२४ (५) प्रमाणे नोंदविण्यात आलेले आहेत. तसेच, अपघाताची इंडलँड व्हेसल ॲक्ट (Inland Vessel Act) मधील सुरक्षितता व स्थिरता नियमांचे आणि संबंधित कायद्यांच्या उल्लंघना प्रकरणी सर्वकष चौकशी करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

    ००००

    नंदकुमार वाघमारे/विसंअ/







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed