• Fri. Dec 27th, 2024

    आई-वडील शेतकरी,बेताची परिस्थिती,कष्टाच्या जोरावर ‘इस्त्रो’ त शास्त्रज्ञपदी निवड! कोल्हापुरच्या पठ्ठ्याचा प्रेरणादायी प्रवास

    आई-वडील शेतकरी,बेताची परिस्थिती,कष्टाच्या जोरावर ‘इस्त्रो’ त शास्त्रज्ञपदी निवड! कोल्हापुरच्या पठ्ठ्याचा प्रेरणादायी प्रवास

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 20 Dec 2024, 5:14 pm

    Kolhapur News : ग्रामीण भागातील युवक शेती आणि फार फार तर सैनिक होण्याची स्वप्न पाहत असतात. मात्र कोल्हापुरच्या राधानगरी तालुक्यातील मालवे या गावातील रोहित लक्ष्मण पाटील याने शास्त्रज्ञ होण्याच स्वप्न पाहिलं आणि ते आज पूर्ण झालय.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    भारताने चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर मंगळावरही आपला झेंडा रोवला. भारताच्या यशस्वी अंतराळ मोहिमांमुळे जगाच्या पटलावर भारताचं नाव ठळकपणे कोरलं गेलं. भारताच्या या यशस्वी कामगीरीचं संपूर्ण श्रेय भारतीय शास्त्रज्ञांना जातं. शास्त्रज्ञांचं कार्य हे तरुणांना प्रेरणादायी ठरतंय. ग्रामीण भागातील युवक शेती आणि फार फार तर सैनिक होण्याची स्वप्न पाहत असतात. मात्र कोल्हापुरच्या राधानगरी तालुक्यातील मालवे या गावातील रोहित लक्ष्मण पाटील याने शास्त्रज्ञ होण्याच स्वप्न पाहिलं आणि ते आज पूर्ण झालय.
    मालवे येथील शेतकरी रोहित लक्ष्मण पाटील यांची घरची परिस्थीती तशी बेताचीच. पण मनात जिद्द असेल आणि जे करायचे आहे त्याबद्दल ध्येय निश्चित असेल तर मेहनीतीच्या जोरावर अडचणींवर मात करुन आपलं आयुष्य समृद्ध करता येतं. आई-वडील शेतकरी असल्याने काबाड कष्ट करून त्यांनी रोहितला शिकवलं. आपला मुलगा मोठा अधिकारी व्हावा अशी इच्छा रोहित च्या आई वडिलांची. आई वडील आपल्या शिक्षणासाठी घेत असलेले कष्ट पाहून रोहित देखील जिद्दीने अभ्यास करायचा. रोहितचे प्राथमिक शिक्षण मालवे विद्यामंदिर, बोरवडे विद्यालय आणि किसनराव मोरे हायस्कूल सरवडे येथे झाले. तर गारगोटीच्या आयसीआरई कॉलेजमधून मेकॅनिकलमधून रोहितने इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केलाय.

    इचलकरंजी येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्याने याच विषयातून डिग्री पूर्ण केली. काही काळ शिरवळच्या एका कंपनीत नोकरी केल्यानंतर त्याला स्पर्धा परीक्षेचे वेध लागले. यातून त्याची ऑइल आणि नॅचरल गॅस या केंद्र सरकारच्या कंपनीमध्ये असिस्टंट इंजिनिअरपदी निवड झाली. हे करत असताना त्याने ‘इस्त्रो’ची परीक्षा दिली मात्र त्याला सुरुवातीला यश आले नाही. मात्र पुन्हा त्याने आणखी जिद्दीने अभ्यास करून दुसऱ्यांदा परीक्षा दिली अन आज त्याची ‘इस्त्रो’ मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे.

    आई वडिलांनी घेतलेले कष्ट आणि त्याला सार्थकी उतरलेला रोहित हे पाहून गावात तर त्याचं कौतुक होतच आहे. मात्र रोहितच्या या उत्तुंग कामगिरीचे त्याच्या शाळेचे मुख्याध्यापक अशोक वारके यांनीही कौतुक केले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed