• Thu. Dec 26th, 2024
    पोलीस भरतीत मदत करु म्हणत नोकरीचं आमिष; सोमनाथच्या आईने रोहित पवारांसमोर सारं सांगितलं

    Rohit Pawar Meet Somnath Suryawanshi Family: परभणीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेतली.

    हायलाइट्स:

    • परभणी हिंसाचार, सोमनाथ सूर्यवंशीचा तुरुंगात मृत्यू
    • रोहित पवारांनी घेतली सूर्यवंशी कुटुंबाची भेट
    • पोलिसांनी नोकरीचं आमिष दिलं, सोमनाथच्या आईचा आरोप
    Lipi

    धनाजी चव्हाण, परभणी: तुमच्या मुलांना पोलीस भरतीमध्ये आम्ही मदत करु. पुण्यात पोलीस भरती दरम्यान ग्राउंडमध्ये त्याला पास करू असे म्हणत परभणीतील पोलीस अधिकाऱ्यांनी मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या भावाला आणि आईला आमिष देऊन मॅनेज करत असल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे आता समोर आले आहे. खुद्द सोमनाथ सूर्यवंशी याच्या भावाने आमदार रोहित पवार यांना ही माहिती दिली आहे.परभणीत १० डिसेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली. त्यानंतर ११ डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती, या बंदला गालबोट लागले आणि दुपारच्या दरम्यान दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत धरपकड राबवली. या धरपकडी दरम्यान पन्नास जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि त्यांना अटक देखील केली होती. याच प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशीच्या परिवाराला भेटण्यासाठी आज आमदार रोहित पवार परभणी येथे आले होते. यावेळी सोमनाथच्या आई आणि भावांनी रोहित पवारांसमोर सर्व घटनाक्रम सांगितला.
    Somnath Suryawanshi: आईच्या चेहऱ्यावर निराशा, भावाची आसवं थांबेनात; सोमनाथबद्दल सांगताना माऊलीचा कंठ दाटला
    पुढे बोलताना सोमनाथ सूर्यवंशीची आई म्हणाली की, रविवारी सकाळी परभणी येथून पोलिसांचा फोन आला आणि सांगितले की तुम्ही तात्काळ परभणीकडे रवाना व्हा तुमच्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री बाराच्या दरम्यान परभणीत आल्यानंतर नांदेड परिक्षेत्राचे आयजी शहाजी उमाप यांची भेट घेतली आणि तिथून तात्काळ छत्रपती संभाजी नगरकडे आम्हाला नेण्यात आले. तिथे गेल्यावर आम्हाला आमच्या मुलाचा मृतदेह पाहायला मिळाला. मृतदेहावर प्रचंड मारहाणीच्या खुणा असल्याचेही आम्हाला दिसले.

    सोमनाथची आई म्हणाली की नांदेड परिक्षेत्राचे आयजी शहाजी उमाप म्हणाले की, तुमच्या मुलाचा मृत्यू हार्ट अटॅक ने झाला आहे. त्याला आम्ही कसल्याही प्रकारची मारहाण केली नाही. त्याच्या मृत्यूला पोलीस जबाबदार नाहीत. असे बोलत असतानाच शहाजी उमाप यांच्या बाजूला असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला आमिष दिले. सोमनाथचा भाऊ म्हणाला की ते अधिकारी आम्हाला म्हणत होते की पोलीस भरतीमध्ये आम्ही तुम्हाला मदत करू. पुणे येथे ग्राउंड दरम्यान तुम्हाला पोलीस भरतीत पास होण्यासाठी मॅनेज करू.

    सोमनाथ सूर्यवंशी चा मृतदेह परभणीत आणण्यासही पोलिसांचा होता विरोध छत्रपती संभाजी नगर येथून सोमनाथ सूर्यवंशी चा मृतदेह परभणीकडे आणला जाणार होता. पण परभणी पोलिसांचा त्याला प्रचंड विरोध होता. अंत्यसंस्कार दरम्यान जर काही अप्रिय घटना घडली तर सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय जबाबदार राहील असे पोलीस म्हणत होते. सोमनाथ सूर्यवंशी चा मृतदेह एकतर पुणे येथे घेऊन जा अन्यथा लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात असलेल्या मूळ गावी घेऊन जाण्याचा पोलीस यांचा आग्रह होता. पण, आंबेडकरी तरुणांपुढे पोलिसांचे काही चालले नाही आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृतदेहावर परभणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

    Parbhani News: पोलीस भरतीत मदत करु म्हणत नोकरीचं आमिष; सोमनाथच्या आईने रोहित पवारांसमोर सारं सांगितलं

    एकंदरीतच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना परभणी पोलिसांकडून वेगवेगळी आमिषे देऊन मॅनेज करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता या प्रकरणात काहीतरी काळबेर आहे का असा संशय मात्र निर्माण होत आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed