Uddhav Thackeray: लोकसभा, विधानसभा निवडणुकीत खराब कामगिरी करणाऱ्या शिवसेना उबाठासाठी आता मुंबईत प्रतिष्ठेची लढाई असेल. महायुतीनं विधानसभा निवडणुकीत दणदणीत कामगिरी केली आहे.
विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षाला केवळ २० जागा मिळाल्या. यातील १० जागा त्यांनी एकट्या मुंबईत जिंकल्या. त्यामुळे मुंबईतील शिवसेना उबाठाचा जनाधार अद्याप बऱ्यापैकी टिकून असल्याचं चित्र आहे. मुंबई भाजपनंतर शिवसेना उबाठा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. आता मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना उबाठानं कंबर कसली आहे. मुंबई मनपावर ठाकरेंची ३ दशकांपासून सत्ता आहे. ती टिकवण्याचं आव्हान आता त्यांच्यासमोर आहे.
प्रमुख खाती पाच अन् दावेदार सात; भाजपमध्ये प्रचंड चढाओढ, स्पर्धेत कोण बाजी मारणार?
मुंबई भाजप अध्यक्ष राहिलेले आशिष शेलार आता मंत्री झाले आहेत. भाजपमध्ये असलेला एक व्यक्ती, एक पद हा नियम लक्षात घेता मुंबई अध्यक्ष पदासाठी भाजपनं नव्या चेहऱ्याचा शोध सुरु केला आहे. मूळचे वरळीचे असलेले, २०१९ मध्ये बोरिवलीतून विधानसभा लढलेले आणि विजयी झालेले सुनील राणे यांचं नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. यंदा त्यांचं तिकीट कापण्यात आलं. तेव्हापासून त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी नाही.
कांदिवलीचे आमदार अतुल भातखळकर, अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांचीही नावं मुंबई अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. लोकसभा निवडणुकीत तिकीट कापण्यात आल्यानंतर शांत बसलेल्या मनोज कोटक यांचंही नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. भाजप पुन्हा एकदा मुंबईत मराठी अध्यक्ष देणार की अमराठी चेहरा पुढे करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. ठाकरेंकडून मराठी अस्मितेचा मुद्दा सातत्यानं लावून धरला जातो. त्यामुळे भाजप अध्यक्षपदी मराठी चेहरा देण्याची दाट शक्यता आहे.
मंत्रिपद मिळालेल्यांना धाकधूक अन् धास्ती; ‘लाडक्या’ खात्यांमुळे अडचणी; तिढा का वाढला?
मुंबई महापालिकेची अखेरची निवडणूक २०१७ मध्ये झाली. त्यावेळी शिवसेना, भाजपची राज्यात सत्ता होती. पण पालिका निवडणूक दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. शिवसेनेनं ८४, तर भाजपनं ८२ जागा जिंकल्या. संधी असूनही भाजपनं मुंबई महापालिकेची सत्ता सेनेसाठी सोडली. २०१२ मध्ये केवळ ३१ जागा जिंकलेल्या भाजपला ८२ जागांपर्यंत नेण्याची किमया आशिष शेलारांनी करुन दिली. त्यांनीच या निवडणुकीत भाजपचं नेतृत्त्व केलं. त्यामुळे मंत्री असतानाही पुढील काही महिने अध्यक्षपद त्यांच्याकडेच राहणार का, याचीही चर्चा सुरु आहे.