Sudhir Mungantiwar: भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेला आहे. गेल्या मंत्रिमंडळात सांस्कृतिक मंत्रालय सांभाळणाऱ्या मुनगंटीवारांना यंदा फडणवीस सरकारमध्ये स्थान मिळालेलं नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुमचं नाव मंत्र्यांच्या यादीत असल्याचं सांगितलं होतं, असा दावा मुनगंटीवारांनी केला आहे. ‘१४ डिसेंबरच्या रात्री मला बावनकुळेंचा फोन आला होता. फडणवीसांशीदेखील माझं बोलणं झालं होतं. तुमचं यादीत नाव आहे, असं मला दोघांनीही सांगितलं होतं. १५ तारखेला शपथविधी होता. त्याच्या आदल्या रात्री बावनकुळेंची भेट झाली. तुमचं नाव यादीत आहे, असं ते म्हणाले. पण त्यांनी केवळ १ शंका उपस्थित केली होती. वरिष्ठांनी काही सांगितलं तर एखादेवेळी ४-५ जण कमी होतील. जर तसा मुद्दा उपस्थित झाला तर ४-५ नावं कमी होऊ शकतात असं ते म्हणाले होते. पण तसा कोणताच मुद्दा उपस्थित झाला नाही,’ असं मुनगंटीवारांनी सांगितलं.
लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून? पुरवणी मागण्यांच्या आकड्यांमधून महत्त्वाचे अपडेट
‘मंत्रिपदांसाठी आम्ही नावं पाठवली आहेत, असं बावनकुळे मला म्हणाले. मागच्या टर्ममधील काही जणांना वगळून आपण नव्यांना संधी देऊ, असं एखाद्या वेळी केंद्रीय पातळीवरुन सांगितलं जाऊ शकतं. मागच्या टर्ममध्ये आम्ही ५-६ जण मंत्री होतो. तितकीच एक शंका त्यांनी बोलून दाखवली. पण तसं काही झालेलं नाही,’ असं मुनगंटीवार म्हणाले.
मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्यानंतर मुनगंटीवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी त्यांनी हुकलेल्या संधीबद्दल अधिक बोलण्यास नकार दिला. ‘जे झालं ते झालं. आता त्यावर चर्चा करण्यात मला काही आनंद नाही. तो विषय संपला आहे. आता मला आमदार म्हणून काम करायचं आहे. मी मन लावून काम करणार आहे,’ असं मुनगंटीवारांनी म्हटलं.
महायुतीतलं ‘ते’ १ मंत्रिपद कोणासाठी? चर्चा ऑपरेशन लोटस अन् देवाभाऊंच्या ‘ट्युशन टीचर’ची
मंत्रिमंडळात स्थान देण्यात न आलेल्या नेत्यांबद्दल पक्षानं काही वेगळा विचार केला असेल. मुनगंटीवारांशी माझं प्रदिर्घ बोलणं झालं आहे, असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर काल सकाळी बोलणं झालं. पण प्रदिर्घ बोलणं झालेलं नाही, असं मुनगंटीवार म्हणाले. फडणवीसांची भेट घेणार का, असा प्रश्न विचारला असता, भेटीची घाई नाही. आता माझ्या डोक्यावरचं मंत्रिपदाचं ओझं उतरलं आहे. त्याचा आनंद मला घेऊ द्या. काही भेटीगाठी राहिल्या आहेत. त्या घेऊ द्या, असं उत्तर मुनगंटीवारांनी दिलं.