Manikrao Kokate gets chance in Mahayuti New Cabinet: ओबीसींचे फायरब्रँड नेते म्हणून ख्याती असणारे नाशिकमधील येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. तर नाशिकमधील सिन्नरच्या आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
कोकाटे यांनी दीड वर्षांपूर्वी सिन्नर मतदारसंघात झालेल्या एका कार्यक्रमात अजित पवारांसमोर “मला मंत्री करा” अशी इच्छा व्यक्त केली होती. ती इच्छा आज अजितदादांनी पूर्ण केली आहे. ४ वेळा सिन्नरचे आमदार राहिलेले माणिकराव कोकाटे यांना अखेर मंत्रिमंडळात स्थान मिळाले. यानंतर सिन्नरमध्ये त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. मात्र राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष सुरू असताना मनोज जरांगे यांना अंगावर घेणाऱ्या छगन भुजबळ यांना डच्चू देण्यात आल्याने भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे.
Maharashtra Cabinet Expansion : भाजपकडे १९, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे किती मंत्री? कोणत्या पक्षातून कोणाला संधी; पाहा संपूर्ण यादी
कोकाटेंची ती इच्छा पूर्ण मात्र जबाबदारी कोणती?
सिन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. त्यांनी दीड वर्षांपूर्वी सिन्नर तालुक्यातील शहा येथे झालेल्या एका कार्यक्रमात अजित पवारांसमोर मंत्रीपदाची इच्छा बोलून दाखवत “मला फक्त एक वर्षासाठी ऊर्जा किंवा वित्त मंत्री करा, तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाच तास मोफत दिवसाढवळ्या लाईट दिल्या शिवाय राहणार नाही” असे वक्तव्य केले होते. त्यानंतर अजित पवारांनी कोकाटेंच्या इच्छेबद्दल बोलताना सांगितले की, योग्य वेळ येऊ द्या, तुम्हाला योग्य निर्णय घेतलेला चित्र दिसेल. ती योग्य वेळ आता आली असून कोकाटेंनी जे खातं मिळावं अशी अपेक्षा व्यक्त केली ते ऊर्जा किंवा वित्त खातं मिळणार की महायुती त्यांच्यावर वेगळ्या खात्याची जबाबदारी टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
छगन भुजबळ येवल्यातून सलग पाचव्यांदा आमदार झाले आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असल्याने अजित पवार भुजबळांवर मंत्रिपदाची जबाबदारी टाकणार अशी सर्वांनाच अपेक्षा होती. मात्र ऐनवेळी त्यांचं नाव मंत्रीपदाच्या यादीतून वगळण्यात आल्याने भुजबळांसह त्यांचे हजारो समर्थक नाराज झाले आहे. मागील दोन वर्षांपूर्वी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा सुरू केला आहे. यावेळी मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळावे, ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळू नये, अशा प्रकारची भूमिका ओबीसी नेते छगन भुजबळांनी घेतली होती. यासाठी त्यांनी मनोज जरांगेंना त्यांनी अंगावर घेतलं. त्यानंतर त्यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला. महायुतीच्या यशामध्ये ओबीसींचा मोठा वाटा असून ओबीसी नेत्यालाच मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्याची चर्चा असून छगन भुजबळांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.