Parbhani Somnath Suryavanshi Cause of Death is Clear: सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाल्याची वार्ता संपूर्ण जिल्हाभर पसरली. आज सकाळपासूनच परभणी शहरांमध्ये सर्व बाजारपेठ बंद आहे. आंबेडकरी अनुयायांनी थेट जिल्हा रुग्णालय गाठले आहे.
हायलाइट्स:
परभणीत झालेल्या दगडफेक प्रकरण
न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू
छातीत कळ येत असल्याने रुग्णालयात मृत्यू
धनाजी चव्हाण, परभणी : १० डिसेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली. त्यानंतर ११ डिसेंबर रोजी परभणी बंद दरम्यान शहरात दगडफेक जाळपोळच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर परभणी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि दगडफेक करणाऱ्यांना गुन्हे दाखल करून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा छातीत कळ येत असल्याने रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना परभणीत घडली आहे. आता न्यायालयाच्या निगराणीत शवविच्छेदनाची प्रक्रिया छत्रपती संभाजीनगर येथे होणार असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना एका व्यक्तीने केली. विटंबना केल्यानंतर त्याला लगेचच पुतळा परिसरात असलेल्या नागरिकांनी पकडून मारहाण देखील केली. विटंबना झाल्याची वार्ता शहरभर पसरल्यानंतर आंबेडकर आणि पुतळा परिसरात मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. यावेळी त्यांनी रास्ता रोको आंदोलन तसेच रेल रोको आंदोलन केले. परभणी पोलिसांनी मध्यस्थी करत १० डिसेंबर रोजी संध्याकाळी सर्वांना तेथून काढून दिले. ११ डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली. सकाळपासूनच सर्व व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाणे बंद ठेवली होती. दुपारी बारापर्यंत हा बंद व्यवस्थित सुरू असताना १२ नंतर मात्र या बंदला चांगलेच गालबोट लागले. आंबेडकरी अनुयायांनी बंद असलेल्या दुकानांवर दगडफेक केली तसेच काही ठिकाणी जाळपोळही करण्यात आली. यानंतर मात्र परभणी पोलीस ॲक्शन मोडवर आले आणि एसआरपीएफच्या तुकड्या परभणीत दाखल झाल्या. आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आणि वेगवेगळी आठ ते नऊ गुन्हे दाखल केले असून जवळपास २०० जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. Devendra Fadanvis: मी पुन्हा आलोय! ढोल-ताशे, भजनी मंडळ, पृष्पवृष्टी; मायभूमीत CM फडणवीसांचं जंगी स्वागत
ताब्यात घेतलेल्यांपैकी काही जणांना पोलीस कोठडी तर काही जणांना न्यायालयीन कोठडी मिळाली. तसेच पुराव्याअभावी काही जणांची सुटका देखील करण्यात आली. सोमनाथ सूर्यवंशी या वकिली व्यवसायाचे शिक्षण घेणाऱ्या युवकाला देखील न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्यात आले होते. आज सकाळी छातीमध्ये दुखत असल्याची तक्रार त्याने जेल प्रशासनाला केली. त्याच्या म्हणण्यावरून जेल प्रशासनाने त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी देखील घेऊन आले. पण उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाल्याची वार्ता संपूर्ण जिल्हाभर पसरली. आज सकाळपासूनच परभणी शहरांमध्ये सर्व बाजारपेठ बंद आहे. आंबेडकरी अनुयायांनी थेट जिल्हा रुग्णालय गाठले आहे. तरुण युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर मात्र आता जिल्हाभर हळहळ व्यक्त केली जात आहे. सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ऑन कॅमेरा छत्रपती संभाजीनगर येथे न्यायाधीशांच्या निगराणीमध्ये होणार असल्याची माहिती नांदेड परिक्षेत्राचे IG शहाजी उमाप यांनी दिली आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा