Nashik No Vehicle Day: नववर्षात प्रत्येक महिन्याचा एक दिवस कार्यालयात येण्याकरिता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची मदत घ्यावी, अशी अभिनव संकल्पना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मांडली आहे.
शहरातील रस्त्यांवर दररोज वाहतूक कोंडीत अडकण्याचा अनुभव घराबाहेर पडणारी प्रत्येक व्यक्ती घेतच असते. जिल्हाधिकाऱ्यांपासून महसूल विभागातील अगदी शिपायापर्यंत कुणीही यास अपवाद नाही. जिल्हाधिकारी कार्यालय हे तर शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. बाजूलाच जिल्हा न्यायालय, बसस्थानक, औषधांची मोठी बाजारपेठ, तर समोरील बाजूस शाळा आहेत. त्यामुळे सीबीएसपासून अशोक स्तंभापर्यंतचा रस्ता रात्री उशिराच मोकळा श्वास घेऊ शकतो. ही वाहतूक कोंडी आणि प्रदूषणही कमी करण्यास अल्पसा हातभार लागावा याकरिता दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी ‘नो व्हेइकल डे’ साजरा करण्याची अभिनव संकल्पना जिल्हाधिकारी कार्यालयात राबविली जाणार आहे. नववर्षातील पहिल्या सोमवार (दि. ६ जानेवारी) पासून या संकल्पनेची अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी कुणालाही सक्ती राहणार नाही. हे पूर्णतः ऐच्छिक असेल असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेसमध्ये राजीनामासत्र? पराभवानंतर चेन्नितला, पटोले पद सोडण्याच्या तयारीत
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने खासगी वाहनाचा वापर टाळून सार्वजनिक वाहनाचा वापर करावा अथवा सायकलवर कार्यालयात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शर्मा यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमधील प्रत्येक शाखेत निवासी उपजिल्हधिकारी राजेंद्र वाघ यांनी त्यासंदर्भातील सूचना पाठविली आहे. प्रदूषणासह वाहतूक कोंडी आणि इंधनाचा व वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी या संकल्पनेचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील तहसीलदार, नाशिकसह इगतपुरी व त्र्यंबकेश्वर प्रांत कार्यालय, धान्य वितरण अधिकारी, कोषागार कार्यालय, तलाठी कार्यालयासह सर्वच विभागांतील शेकडो कर्मचारी या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
मंत्रिपदाची लॉटरी कोणाला? विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी; फरांदे, हिरे, ढिकले, आहेरांच्या नावांची चर्चा
कर्मचाऱ्यांसाठी विशेष ‘ड्रेस कोड’
पहिल्या सोमवारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना विशेष ड्रेस कोडही लागू केला जाणार आहे. त्याच ‘ड्रेस कोड’मध्ये यावे, असे आवाहनही शर्मा यांनी केले आहे. ही संकल्पना राबविण्यामागे कर्मचाऱ्यांमधील संघभावना वाढीस लागावी हा हेतू आहे. त्यामुळे दि. ६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी एकसारख्या रंगाच्या कपड्यांत आणि सार्वजनिक प्रवासी वाहनांतून कार्यालयात येताना पाहायला मिळू शकणार आहेत. पुरुष कर्मचाऱ्यांकरिता फिकट निळा शर्ट आणि गडद निळी किंवा काळी पैंट, तर महिला कर्मचाऱ्यांनी पारंपरिक पिवळ्या रंगातील पोशाख परिधान करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.