• Fri. Dec 27th, 2024
    ‘तो’ नकार अनामच्या जीवावर बेतला; बस अपघातात २० वर्षीय तरुणीचा अंत; ‘त्या’ रात्री काय घडलं?

    Kurla Bus Crash: अनियंत्रित बेस्ट बसनं चिरडल्यानं मुंबईच्या कुर्ल्यात सोमवारी रात्री ७ जणांचा मृत्यू झाला. तर ४८ जण जखमी झाले. मृतांमध्ये हालो पूलमधील दारुवाला चाळीत राहणाऱ्या २० वर्षीय अनाम मुझफ्फर शेखचाही समावेश आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: अनियंत्रित बेस्ट बसनं चिरडल्यानं मुंबईच्या कुर्ल्यात सोमवारी रात्री ७ जणांचा मृत्यू झाला. तर ४८ जण जखमी झाले. मृतांमध्ये हालो पूलमधील दारुवाला चाळीत राहणाऱ्या २० वर्षीय अनाम मुझफ्फर शेखचाही समावेश आहे. नियंत्रण गमावलेल्या बेस्टच्या इलेक्ट्रिक बसनं सर्वात आधी अनामलाच धडक दिली. त्यात अनामचा मृत्यू झाला असून तिचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला, पाठीच्या कण्याला दुखापत झाली आहे. कुर्ल्याच्या एका खासगी रुग्णालयात ते मृत्यूशी झुंज देत आहेत.

    २० वर्षांची अनाम बँकिंगचा कोर्स करत होती. सोमवारी रात्री ती दादरहून कुर्ल्याला तिच्या घरी जात होती. रेल्वे परिसरात ती जवळपास अर्धा तास थांबली. पण एकही रिक्षावाला तिला घरी सोडण्यास तयार झाला नाही. तिनं अनेकांना विचारणा केली. पण रिक्षावाल्यांनी नकार दिला. वेळेत रिक्षा मिळाली असती तर ज्यावेळी बस अपघात घडला, त्यावेळी अनाम तिच्या घरी असती.
    Kurla Bus Accident: ‘त्या’ बेस्ट बसच्या चालकाला फक्त ३ दिवस…; अपघातानंतर तपासात धक्कादायक बाब उघड
    ‘रिक्षा मिळत नसल्यानं अखेर अनामनं तिच्या वडिलांना फोन केला. ते बाईक घेऊन रेल्वे स्थानकाजवळ पोहोचले. अनाम वडिलांसह घरी जात असताना बसनं त्यांना धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की अनाम गंभीर जखमी झाली. तिचे काही अवयव रस्त्यावर पसरले. तिचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात अतिशय भयंकर होता,’ असं अनामच्या काकी कमरुनिसा शेख यांनी सांगितलं. अनामचे वडील अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

    अनामच्या कुटुंबात तिची आई, बाबा आणि मोठा भाऊ आहे. अनामचे वडील मेकअप आर्टिस्ट आहेत. तिचं कुटुंब ५० वर्षांपासून दारुवाला चाळीत वास्तव्यात आहे. या घटनेनंतर अनामच्या कुटुंबियांनी रिक्षावाल्यांबद्दल संताप व्यक्त केला. ‘कुर्ला स्थानक परिसरातील बहुतांश रिक्षा चालक प्रवाशांना थेट नकार देतात. त्यांच्यावर कोणतीही कारवाई प्रशासन करत नाही. आता तरी प्रशासनानं त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी,’ अशी मागणी कमरुनिसा शेख यांनी केली.
    Kurla Accident : पापा, भाभीका इंतकाल हो गया… कुर्ला बस अपघातात होत्याचं नव्हतं, हसत्या खेळत्या घरांवर दुःखाचा डोंगर
    रुग्णालय प्रशासनानं अनामचा मृतदेह शवविच्छेदनानंतर नीट शिवलादेखील नव्हता, असं शेख म्हणाल्या. ‘राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं. त्यांनी मृतदेह आमच्या ताब्यात देण्यापूर्वी किमान तो नीट शिवायला हवा होता. अपघातानंतर अनामचे काही अवयव जमिनीवर पसरले. ते गोळा करुन एका प्लास्टिकच्या पिशवीत टाकण्यात आले. ती पिशवी मृतदेहासोबत आम्हाला देण्यात आली,’ असा आरोप शेख यांनी केला.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed