• Wed. Jan 1st, 2025
    जांभा चिऱ्याची वाहतूक करणारा ट्रक पलटून भीषण अपघात! एका कामगारावर काळाचा घाव, अन्य सहा जण गंभीर

    Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यात जाकादेवी परचुरी मार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. उक्षी रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या उतारात शनिवारी हा अपघात झाला होता. या अपघातात सिद्धू मोतीराम चव्हाण या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    संगमेश्वर : तालुक्यात, ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून अन्य सहाजण जखमी झाले आहेत.
    जांभा चिऱ्याची वाहतूक करणारा ट्रक पलटल्याने मोठा अपघात झाला असून या अपघातात जखमी झालेल्या कामगाराचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. सदर घटनेत सहा जण जखमी झाले होते. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यात जाकादेवी परचुरी मार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. उक्षी रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या उतारात शनिवारी हा अपघात झाला होता. या अपघातात सिद्धू मोतीराम चव्हाण वय वर्षे 32 मूळ राहणार कक्कलमेली तालुका सिंधगी जिल्हा बिजापूर सध्या वास्तव्य चवे देऊड (रत्नागिरी) याच्या डोक्याला मार लागला होता तर अन्य सहाजणांना किरकोळ दुखापत झाली होती. उपचार सुरू असताना सिद्धू मोतीराम चव्हाण याचा मृत्यू झाला आहे.

    ट्रक रस्त्याबाहेर जाऊन पलटी झाला

    रत्नागिरी चवे देऊड येथील अतुल अनंत सावंत यांची मालकी असलेल्या चिरेखाणीमधून त्यांच्याच मालकीच्या असलेल्या ट्रक क्रमांक MH-10-AW-2757 यामध्ये चिरेखाणीमधून चिरे भरून चालक आनंद धरसिंग राठोड ट्रक घेऊन निघाला होता. दरम्यान, चवे येथून परचुरी बौद्धवाडी येथे त्याच्या बरोबर चिरे उतरवण्यासाठी अन्य सहा कामगारांना ट्रक च्या कॅबिन मध्ये बसवून तो घेऊन निघाला असताना हा अपघात झाला. संगमेश्वर पोलीस ठाणे दूरक्षेत्राच्या हद्दीत असलेल्य परचुरी येथे उक्षी रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या वळण असलेल्या उतारात ट्रक चा ब्रेक निकामी झाल्याने तो ट्रक रस्त्याबाहेर जाऊन पलटी झाला होता.
    या अपघाताची माहिती ट्रकचे मालक अतुल अनंत सावंत यांनी स्वतः संगमेश्वर पोलीस ठाण्याला दिली. घटनेची माहीती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव, डिंगणी पोलीस दूरक्षेत्राचे हेड कॉन्स्टेबल शांताराम पंदेरे, कॉन्स्टेबल म्हस्कर, कोलगे ह्यांनी घटनास्थळी पोहचून अपघाताची पाहणी करून पंचनामा केला असून, या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शांताराम पंदेरे करत आहेत.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *