Devendra Fadnavis as Maharashtra New CM in Oath Taking Ceremony: देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
अखेर ते पुन्हा आले, फडणवीसांनी करुन दाखवलं
विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करत महायुतीने बहुमत प्राप्त केलं. यात एकट्या भाजपने १३२ जागा जिंकल्या, त्यामुळे भाजपसाठी हा एक मोठा विजय ठरला. यासह भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. हा विजय आजपर्यंतचा सर्वात मोठा विजय मानला गेला. त्यामुळे मुख्यमंत्रिपद हे भाजपकडेच जाणार हे निश्चित होतं. पण तरीही जवळपास १० – ११ दिवसांनी मोठ्या राजकीय घडामोडींनंतर मुख्यमंत्रिपदाची घोषणा झाली. भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकमुखाने देवेंद्र फडणवीसांची निवड करण्यात आली आणि मी पुन्हा येईन म्हणणारे फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले आहेत.
तर, उपमुख्यमंत्रिपदाबाबत शपथविधीच्या काही तासांपूर्वीपर्यंत घडामोडी घडत होत्या. सकाळपर्यंत एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही याबाबत संभ्रम होता. मात्र, अखेर फडणवीसांच्या प्रयत्नांना यश आलं आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शपथ ग्रहण केली.
मुंबईच्या आझाद मैदानावर या शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. भव्य असा मंच आणि भलामोठा मांडव आझाद मैदानात टाकण्यात आला होता. या सोहळ्यासाठी देशभरातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. यावेळी मंचावर भाजपचे बडे नेते उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामण, पियुष गोयल, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, यांच्यासह देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. तसेच, अनेक राज्यांचे उपमुख्यमंत्रिही यावेळी उपस्थित होते.
त्याशिवाय, उद्योगपती अनिल अंबानी, अनंत अंबानी राधिका मर्चंट यांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावली. तर बॉलिवूडचे अनेक तारेही येथे उपस्थित होते. शाखरुख खान, सलमान खान, रनवीन सिंह, विक्की कौशल, माधुरी दिक्षित त्यासह सचिन तेंडुलकर हा देखील या शपथविधीला उपस्थित होता.