महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 2 Dec 2024, 5:43 pm
नंदुरबार : 15 वर्षीय जितेंद्र वसावे याला अठरावर्षांच्या आतील देशातील उत्कृष्ट खो-खो खेळाडू म्हणून वीर अभिमन्यू पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याचे यश युवकांना प्रेरणा देणारे आहे. चांगले गुरु मिळाले तर यश प्राप्त होते. गुरूंचा विश्वास सार्थ ठरवणारी प्रेरणादायी जितेंद्र वसावे याची कहाणी आहे.
सातपुड्यातील दुर्गम भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी गाव आहे. या गावात 24 पाडे येतात. त्यापैकी डोंगरफळी ह्या दुर्गम पाड्यात जितेंद्र धरमसिंग वसावे याचे तिसरीपर्यंत शिक्षण झाले. त्याचे वडील धरमसिंग रामा वसावे हे शेतकरी आहेत. अल्प शेतीत ते आपला उदरनिर्वाह करतात. जितेंद्र वसावे लहान असतानाच त्याच्या आईचे निधन झाले. वडिलांनी त्याचा सांभाळ केला. पुढील शिक्षणासाठी त्याच्या गुरुच्या साहाय्याने धाराशिव गाठले. सध्या तो धाराशिव शहरातील श्रीपतराव भोसले विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत असताना किरण वसावे याला राष्ट्रीय खो- खो स्पर्धेतील भारतातील सर्वोत्कृष्ट खेळाडूला दिला जाणारा वीर अभिमन्यू पुरस्कार प्रदान करण्यात आला. 25 ते 30 नोव्हेंबर दरम्यान उत्तर प्रदेश मधील अलिगड येथील अहिल्याबाई होळकर स्टेडियम मध्ये राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुले व मुलींच्या संघाने सलग दहाव्यांदा कुमार व मुलींच्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत विजेतेपद पटकावण्याचा कारनामा करत दुहेरी जेतेपदाचा मान मिळविला. मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिशावर 33-29 अशी 1.30 मिनिटे वेळ राखून मात केली. महाराष्ट्राच्या विजयात जितेंद्र वसावे याची विशेष भूमिका असल्याने त्याला वीर अभिमन्यू पुरस्कार देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.
जितेंद्र वसावे याचा प्रेरणादायी प्रवास
जितेंद्र वसावे याने तिसरीपर्यंत डोंगरफळी या पाड्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले. दरम्यान अक्कलकुवा तालुक्यातील कुवा येथे प्रवीण जाधव हे जिल्हा परिषदेचे शिक्षक होते. त्या ठिकाणी त्यांनी खो-खो ची टीम तयार केली होती. त्यानंतर 2017 मध्ये त्यांची होराफळी येथे बदली झाली. मात्र खो-खो साठी विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत होते. नाशिक विभागीय स्पर्धांमध्ये जितेंद्र वसावेसह काही विद्यार्थी चमकले. प्रवीण जाधव यांनी या विद्यार्थ्यांच्या पालकांशी चर्चा करून मुलांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेत धाराशिव येथे आणले. यासाठी त्यांना महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रजीत जाधव यांची मोलाची साथ मिळाली. जितेंद्र वसावे हा सुटीसाठी गावी आला. मात्र त्याला परत पाठवण्यासाठी त्याचे वडील तयार नव्हते. अखेर प्रवीण जाधव यांनी डोंगरफळी गाठली व पालकांशी चर्चा करून जितेंद्र वसावे याला पुन्हा धाराशिव येथे घेऊन गेले. जितेंद्र वसावे याने विविध स्पर्धा गाजवत राज्यातील संघात स्थान मिळवले. यंदा धाराशिवच्या संघाने राष्ट्रीय खो- खो स्पर्धेत पहिल्यांदा फायनल जिंकली. विशेष म्हणजे या टीम मधील सर्व खेळाडू हे नंदुरबार जिल्ह्याचे आहेत. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू ठरलेल्या जितेंद्र वसावे याला वीर अभिमन्यू पुरस्कार प्रदान करण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यातून 24 मुलं खो-खो साठी गेले असताना पैकी 18 मुल नॅशनल खेळाडू आहेत. आतापर्यंत कुवा व भगदरी येथील चार जणांना खो-खो चा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यामध्ये रवी वसावे यांना भरत अवॉर्ड, 14 वयोगटातील किरण गोसावी यांना 2021 साली पुरस्कार प्राप्त झाला आहे. आराध्य गोसावी यांना 2023 मध्ये तर जितेंद्र वसावे याला 2024 मध्ये पुरस्कार प्राप्त झाला. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही गुरुंची साथ मिळाल्याने दुर्गम भागातील जितेंद्र वसावे याने पुरस्कार पटकावला. त्यामुळे त्याची कहाणी युवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.