अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालातून पुणे जिल्ह्यात त्यांचंच वर्चस्व असल्याचं दाखवून दिलंय. यंदाच्या निवडणुकीत मावळ विधानसभा मतदारसंघ हा विशेष चर्चेत राहिला. सुनील शेळके यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच कडाडून विरोध होत होता. एवढंच नाही तर भाजपनेही शेळकेंच्या उमेदवारीला विरोध केला होता. संपूर्ण निवडणुकीत विरोधी पक्षांसह सर्वांनीच अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता. पण सुनील शेळके यांनी मात्र मावळची खिंड एकट्याने लढवली. एकाही मोठ्या नेत्याची सभा देखील या मतदार संघात झाली नव्हती. त्यामुळे सुनील शेळके यांना जे यश मिळालंय त्यात त्यांनी घेतलेली मेहनतच असल्याचं सिद्ध झालं. यानिमित्त अजित पवारांनी सुनील शेळके यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. मावळच्या विजयानंतर शेळकेंनी अजित पवारांची भेट घेतली. यावेळी अजित पवरांनी शेळके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा किस्सा सांगितला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीवेळी सुनील शेळके यांची अजित पवारांनी वेगळी ओळख करून दिली होती.