• Mon. Nov 25th, 2024
    आगीचा भडका उडाला, नवनिर्वाचित आमदार जखमी, भर सामन्यात जयस्वाल आणि लाबुशेनमध्ये जुंपली, पाहा Video

    Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या लेटेस्ट मराठी बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’वर, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी

    १. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर निर्माण झालेल्या नकारात्मक परिस्थिती बदलण्यासाठी महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राबविलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच हिंदू मते एकत्रित करण्यासाठी, बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ या दिलेल्या घोषणा यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहिणींनी एकीकडे सत्तेची ओवाळणी दिली, तर दुसरीकडे हिंदू मतांचा महायुतीवर पाऊस पडला व मुस्लिम मतांची टक्केवारी घसरल्याचे दिसून येत आहे. बातमी वाचा सविस्तर…
    २. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष हा सत्तेत असेल, असा दावा करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या निवडणुकीत खातेही उघडता आलेले नाही. पक्षाकडून तब्बल १२५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्यानंतरदेखील एकही जागा जिंकता न आल्याने मनसेचा या निवडणुकीत सुपडा साफ झाला आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यासह नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांच्यासह अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. मुख्य म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत पक्षाच्या मतांचा टक्का अवघ्या १.६० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या निवडणुकीत हे प्रमाण २.२५ टक्के इतके होते.

    ३. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव होणार, त्यांच्या १०-१५ जागाच येतील, स्वतः अजित पवार हे बारामतीतून पडू शकतात, जिंकलेच तर अत्यंत कमी मताधिक्याने जिंकतील, बारामतीचा अंदाज शरद पवार यांच्याइतका कुणालाच येत नाही, असे सगळे आडाखे बारामती आणि राज्यातील जनतेने पार मातीमोल ठरवले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जवळपास ८० टक्क्यांच्या आसपासचा ‘स्ट्राइक रेट’ राखला. त्यांच्या ४०च्या वर जागा संध्याकाळापर्यंत येत असल्याचे निश्चित झाले आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत सन्नाटा पसरला, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी ल्यायलेला गुलाबी रंग अधिकच निरखून निघाला.

    ४. महायुतीने पुणे जिल्ह्यात २१ पैकी १८ जागा मिळवून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. त्यामुळे आता मंत्रिमंडळात पुणे जिल्ह्याला चांगले प्रतिनिधित्व मिळणार असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे दोन्ही ‘दादा’ मंत्रिमंडळात महत्त्वाच्या खात्यांचे दावेदार राहतील. याचबरोबर विशेषत्वाने आमदारकीचा चौकार मारलेल्या माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, महेश लांडगे आदींना प्रामुख्याने आणि राहुल कुल, सुनील कांबळे यांनाही मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

    ५. काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरातांना धक्का देत महायुतीच्या अमोल खताळ यांनी संगमनेर मतदारसंघात बाजी मारली. नवव्या वेळेस संगमनेर विधानसभेत निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या थोरातांचा एका नवख्या तरूणाने दारूण पराभव केलाय.

    ६. शेवटच्या क्षणापर्यंत विजयाची खात्री असलेले भाजप उमेदवार संतुक हंबर्डे यांचा नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाला. काँग्रेस उमेदवार रविंद्र चव्हाण यांनी १ हजार ४५७ मतांनी निसटता विजय मिळवत भाजपला पराभवाची धूळ चारली. सहानुभूतीची लाट आणि पोस्टल मतं हे काँग्रेस उमेदवारासाठी गेमचेंजर ठरले. बातमी वाचा सविस्तर…

    ७. विधानसभा निवडणुकीत शरद पवार विरुध्द अजित पवार यांच्यात झालेल्या थेट लढतीत अजित पवारच सरस ठरले आहेत. दोन्ही पवारांनी आमनेसामने ३८ जागा लढवल्या होत्या, त्यातील ३१ जागांवर अजित पवार यांनी वर्चस्व सिद्ध केले. निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला ८६ पैकी फक्त १० जागांवर विजय मिळवता आला, तर अजित पवार यांनी ५५ जागा लढवून ४१ जागांवर विजय मिळवत स्ट्राइक रेट दाखवून दिला आहे.

    ८. शनिवारी विधानसभेसोबतच लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. नांदेड जिल्ह्यात यंदा धक्कादायक निकाल लागला आहे. मतदारांनी विद्यमान आमदारासह अनेकांना नाकारलं आहे. त्यातच एकाच घरातून काँग्रेस आणि भाजपकडून विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणूक लढवत असलेल्या दोन सख्ख्या भावांचा देखील या निवडणुकीत निसटता पराभव झाला आहे. संतुक हंबर्डे यांचा लोकसभा पोटनिवडणुकीत तर काँग्रेसचे विद्यमान आमदार मोहन हंबर्डे या यांचा विधानसभेच्या निवडणूकीत पराभव झाल्याचं पाहायला मिळत आहे. बातमी वाचा सविस्तर…

    ९. चंदगड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील थोडक्यात वाचले. कारण औक्षण करत असताना त्यावर गुलाल पडल्याने भडका उडाला. आगीच्या भडक्यात आमदार शिवाजी पाटील यांच्यासह काही महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी मिरवणुकीच्या वेळी शनिवारी रात्री हा प्रकार घडला

    १०. महायुतीच्या झंझावातात उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची धुळधाण उडाली असून, ३५ पैकी तब्बल ३३ जागांवर महायुतीला यश मिळाले आहे. यात भाजपने सर्वाधिक १६ जागा जिंकल्या असून, शिवसेना शिंदे गट ९ जागा मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिला. राष्ट्रवादी अजित पवार गटानेही आठ जागा जिंकल्या असून, त्यात नाशिक जिल्ह्याचा वाटा सर्वांत मोठा आहे. गेल्या वेळेस पाच जागांवर असलेल्या काँग्रेसचे अस्तित्व आता अवघ्या एका जागेवर राहिले असून, एमआयएमलाही दोनपैकी एक जागा गमवावी लागली आहे. मंत्री दादा भुसे, छगन भुजबळ, डॉ. विजयकुमार गावित, गिरीश महाजन, अनिल पाटील आणि गुलाबराव पाटलांनी आपली प्रतिष्ठा राखली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *