Ajit Pawar as maharashtra CM Banner in Pune: विधानसभा निवडणुका २०२४ची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर कोणाचं सरकार सत्तेत येणार, याकडे संपूर्ण राज्याच्या नजरा लागल्या आहेत. यातच पर्वती मतदारसंघात संतोष नांगरे यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाचे बॅनर लावले आहेत.
पर्वती मतदारसंघात संतोष नांगरे यांचे समर्थक करण गायकवाड यांनी अजित पवारच मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लावले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महायुतीत सर्वात कमी जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने लढवल्या होत्या. त्यामुळे आमदारांची संख्या कमी-जास्त झाली, तर अजित पवार हे किंगमेकरच्या भूमिकेत दिसतील, असे एक्झिट पोलचे अंदाज सांगतात.
परळीत शरद पवारांच्या नेत्याला मारहाण, राजेसाहेब देशमुखांकडून धनंजय मुंडेंचा समाचार, फेर मतदानाचीही केली मागणी
अजित पवार यांनी पक्षात फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री पदाबाबत अनेक वेळा जाहीर भाषणांमध्ये खदखद व्यक्त केली आहे. चार वेळा उपमुख्यमंत्री राहूनही अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली नाही. मात्र, शरद पवार यांचा हात सोडून भाजप आणि शिवसेनेसोबत सत्तेत गेल्यानंतर अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची स्वप्नं दिसू लागली आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
आता विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडल्यानंतर थेट मुख्यमंत्रीपदाबाबत लॉबिंग सुरू झाले आहे. येत्या दोन दिवसांत हे चित्र स्पष्ट होईल आणि अजित पवार खरोखर मुख्यमंत्री होतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.