• Mon. Nov 25th, 2024
    मुलींना डिफेन्समध्ये संधी कशी मिळाली? शरद पवारांनी सांगितला आर्मी चीफचा किस्सा

    Sharad Pawar Latest Marathi News: माझा स्वत:चा अनुभव असा आहे की, ज्यांना संधी दिली जबाबदारी सोपवायची आणि ते कर्तृत्व दाखवतात. समाजामध्या कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषांकडे असतो असं नव्हे. कर्तृत्व, कष्ट करायची संधी दिली की मुलीसुद्धा हे करु शकतात.

    हायलाइट्स:

    • मुलींना डिफेन्समध्ये संधी कशी मिळाली?
    • शरद पवारांनी सांगितला आर्मी चीफचा किस्सा
    • संरक्षणमंत्री असताना काय घडलं होतं?
    महाराष्ट्र टाइम्स.कॉम
    शरद पवार बातम्या

    मुंबई : राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेले ४० आमदार, लोकसभा निवडणुकीत मिळालेलं मोठं यश आणि राजकारणातला अनेक दशकांचा अनुभव अशा अनेक पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार हे मुळ राष्ट्रवादीचे प्रमुख म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अख्खा महाराष्ट्र पालथा घालत आहेत. त्याचदरम्यान, शरद पवार यांनी बीडमध्ये ‘बोल भिडू’ला एक खास मुलाखत दिली. त्यात त्यांनी निवडणुकीची तयारी, उमेदवारांची निवड, फुटीर आमदारांबद्दलची भूमिका, महाराष्ट्रातले वातावरण आणि विशेष म्हणजे ते संरक्षणमंत्री असताना त्यांचा आणि आर्मी चीफचा किस्सा पवारांनी यावेळी सांगितला.राज्यात महिलांना महिन्याला दीड हजार रुपये देणं आणि लाभार्थ्यांचा वर्ग तयार करणं, असा सध्या प्रयत्न सुरु आहे. असा सवाल शरद पवारांना विचारला असता ते म्हणाले की, ”मुलींना स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी प्रोत्साहीत करणे यात फारसं काही चुकीचं नाही. पैशाचं वाटप करणे हे कितपत योग्य आहे. याची चर्चा होऊ शकते. आज नव्या पिढीत मुली शिक्षित व्हायला लागल्या आहेत. माझा स्वत:चा अनुभव असा आहे की, ज्यांना संधी दिली जबाबदारी सोपवायची आणि ते कर्तृत्व दाखवतात. समाजामध्या कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषांकडे असतो असं नव्हे. कर्तृत्व, कष्ट करायची संधी दिली की मुलीसुद्धा हे करु शकतात.
    Sharad Pawar: अजित पवारांना सोबत घेणार का? शरद पवारांच्या वक्तव्याने पुन्हा राजकारणाला कलाटणी!

    ”मला आठवतंय की मी संरक्षणमंत्री होतो तेव्हा एकदा अमेरिकेला गेलो होतो. बऱ्याच देशांमध्ये एक पद्धत आहे की, एखाद्या देशाचा डिफन्स मिनिस्टर येतो. तो विमानातून उतरल्यानंतर त्यांना सॅल्युट देतात. अमेरिकेत गेलो मी त्यादिवशी विमानातून खाली उतरलो तेव्हा सॅल्युट द्यायला समोर तिथे जवानांची तुकडी होती. ती तुकडी बघिल्यानंतर असं लक्षात आलं की, त्याच्यात एकही पुरुष नव्हता, सगळ्या महिला होत्या. त्यांनी मला सॅल्युट दिला. हेच चित्र मी मलेशियामध्ये देखील बघितलं. त्यानंतर मी असा विचार करतो होतो की, अनेक देशांमध्ये महिलांवर ही जबाबदारी टाकली जाते, मग आपण का नाही करायचं. मी यासंबंधीचा निर्णय घ्यायचा विचार केला. आपल्याकडं एक पद्धत होती, आता आहे की नाही माहिती नाही. संरक्षण मंत्र्याच्या ऑफिसमध्ये दर सोमवारी सकाळी ९ वाजता आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स याचे प्रमुख आणि संरक्षण खात्याचे सचिव यांची एक बैठक होत असते. त्याच्यात एक चर्चा करतात की देशात काय परिस्थिती आहे, सीमेवर काय परिस्थिती आहे, पलीकडचे लोक काय करतात. त्यानंतर समुद्रामधली स्थिती काय आहे. जे नेव्हीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. यासंबधीची चर्चा करत असतात आणि डिफेन्स मिनिस्ट्रित आणखी काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे का? याबद्दल मोकळेपणाने सगळ्यांनी मतं मांडण्याची ही पद्धत आहे”, असं पवार म्हणाले.

    ”एका बैठकीमध्ये मी हा प्रश्न मांडला की, जगातल्या काही देशांमध्ये मुलींना संधी दिली जाते मग आपण का देऊ नये. आमच्या तिन्ही आर्मी चिफने सक्त विरोध केला. मी सगळ्याचं ऐकलं आणि एक महिन्याने पुन्हा हा विषय काढला. पुन्हा या तिघांचं मत तेच होतं. आणखी एक महिना मी थांबलो आणि त्यांना तुम्ही विचार करा म्हणून सांगितलं. तिसऱ्या बैठकीत सुद्धा त्यांनी शक्य नाही म्हणून सांगितलं. तिसऱ्यांदा नाही सांगितल्यानंतर मी त्यांना सांगितलं की, संरक्षणमंत्री मी आहे, धोरणात्मक निर्णय घ्यायचा माझा अधिकार आहे. मी निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणं हे तुमचं काम आहे. मी ९ टक्के जागा मुलींना देण्याचा निर्णय घेतोय आणि तो निर्णय झाला”, संरक्षणमंत्री असताना घडलेल्या या किस्स्याला शरद पवारांनी पुन्हा एकदा उजाळा दिला.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *