• Mon. Nov 25th, 2024

    संजय शिरसाट VS राजू शिंदेंचे आव्हान, छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड?

    संजय शिरसाट VS राजू शिंदेंचे आव्हान, छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड?

    Chhatrapati Sambhajinagar West Constituency: पश्चिम मतदारसंघातून त्यांनी २००९ ते २०१९पर्यंत विजय मिळवला आहे. या विधानसभा निवडणुकीत शिरसाट यांच्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजू शिंदे यांचे आव्हान आहे.

    महाराष्ट्र टाइम्स
    sanjay vs raju

    छत्रपती संभाजीनगर: औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात पाच प्रमुख उमेदवार आहेत. दोन्ही शिवसेना आमनेसामने आल्यामुळे यावेळची लढत अटीतटीची होणार आहे. विकासकामांना प्रचारात केंद्रस्थानी आणून आमदार संजय शिरसाट यांनी सलग चौथ्यांदा जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. मतविभाजन कुणाच्या पथ्यावर पडणार त्यावर विजयाचे समीकरण तयार होणार आहे.

    सन २००९ पासून औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे नेतृत्व संजय शिरसाट करीत आहेत. नगरसेवक, सभागृह नेता असा राजकीय प्रवास करीत शिरसाट २००९ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. पश्चिम मतदारसंघातून त्यांनी २००९ ते २०१९पर्यंत विजय मिळवला आहे. या विधानसभा निवडणुकीत शिरसाट यांच्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजू शिंदे यांचे आव्हान आहे. त्यामुळे शिरसाट यांना सलग चौथ्यांदा निवडून येण्यासाठी बरीच राजकीय समीकरणे जुळवावी लागत आहेत. या मतदारसंघावर नेहमी शिवसेनेचे वर्चस्व राहिलेले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होती. तरीसुद्धा मागील निवडणुकीत भाजपचे तत्कालीन पदाधिकारी राजू शिंदे अपक्ष लढले होते. ‘एमआयएम’चे अरूण बोर्डे आणि वंचित बहुजन आघाडीचे संदीप शिरसाठ निवडणूक रिंगणात होते. काँग्रेसचे रमेश गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता.

    युतीतील पदाधिकारी अपक्ष उभा राहिल्याने संजय शिरसाठ यांना प्रचारात बरीच मेहनत घ्यावी लागली होती. शिंदे यांना ४३ हजार ३४७ मते, एमआयएमचे उमेदवार अरूण बोर्डे यांना ३९ हजार ३३६ आणि संदीप शिरसाट यांना २५ हजार मते मिळाली होती. तर संजय शिरसाट यांना ८३ हजार ७९२ मते मिळाली होती. शिरसाट ४० हजार ३४७ मतांनी विजय झाले होते. नाराजांच्या मतांचे विभाजन त्यांच्या विजयासाठी पूरक ठरले होते. यंदा सर्वच उमेदवारांनी प्रचार जोरात सुरू केला आहे. राजू शिंदे यांनी मशाल हाती घेतली आहे.
    प्रेमसंबंधातून बॉडीचे सात तुकडे, गोराईतील मृत्यूचं गूढ टॅटूमुळे उकललं, जीव घेण्यामागे धक्कादायक कारण
    संदीप शिरसाट स्वराज्य पक्षाकडून, अंजन साळवे वंचित बहुजन आघाडीकडून लढत आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश गायकवाड अपक्ष उमेदवार आहेत. गायकवाड यांची बजाजनगर, वाळूज भागात चांगली बांधणी केल्याची चर्चा आहे. या वेळी एमआयएमचा उमेदवार नसल्याने त्यांची मते कुणाच्या पारड्यात जाणार याची चर्चा आहे. शहरी व ग्रामीण भागात सर्वच उमेदवारांनी प्रचारावर भर दिला आहे. मतविभाजन कुणाच्या पथ्यावर पडणार याची उत्सुकता आहे. दोन्ही शिवसेना आमनेसामने असल्याने चुरशीची लढत होणार आहे. सलग चौथ्यांदा निवडून येण्यासाठी शिरसाट यांच्यासमोर आव्हान असणार आहे.
    उद्धव ठाकरेंना धडा शिकवा! मुंबईतील प्रचारसभेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे आवाहन
    विकासकामांचा प्रचार
    आमदार संजय शिरसाट यांच्यासोबत महायुतीतील घटक पक्ष आहेत. सातारा-देवळाईसह विविध भागात शिरसाट यांनी रस्ते बांधून लोकांमधील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आलेल्या राजू शिंदे यांना उमेदवारी दिल्याने पक्षाअंतर्गत काही प्रमाणात नाराजी आहे. तर शिरसाट यांनी शिवाजीनगरपासून ते बजाजनगरपर्यंत बांधणी ठेवली आहे. विकासकामांचा प्रचार करण्यात येत आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed