• Mon. Nov 25th, 2024
    अजित पवारांविरुद्ध उमेदवार का दिला? स्वत:च्या पक्षाचे किती आमदार निवडून येतील? शरद पवारांनी थेट संख्याच सांगितली

    Sharad Pawar News: विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा होत असलेल्या शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यातील लढाईबद्दल होय. गेल्या काही दिवसात अजित पवारांकडून करण्यात आलेल्या आरोपांना पाहा शरद पवारांनी काय उत्तर दिले.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आपल्या पक्षाचे ५० ते ६० आमदार निवडणून येतील असा विश्वास त्यांनी एका मुलाखतीत व्यक्त केला.

    बोल भिडू ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शरद पवारांनी सांगितले की- आपला आतापर्यंतचा अनुभव असा आहे की- लोक निवडून येतात नंतर पक्ष सोडून जातात. अशा प्रकारच्या घटना २-३ वेळा झाल्या. प्रत्येक वेळी सोडून गेलेल्यांची संख्या ४५ ते ५०च्या दरम्यान होती. पण त्यानंतर जेव्हा निवडणूक होते तेव्हा एका विचारावर आणि पक्षाच्या जोरावर निवडून आले नंतर दुसरीकडे गेले हे लोकांना पडलेले नाही. त्यामुळे आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत जे सोडून गेले. ते फार मोठ्या प्रमाणात निवडून आलेच नाहीत, असे पवारांनी सांगितले. जे पक्षाला सोडून गेले त्यांच्या जागा २-३ का असेनात जास्त आल्याचे अनुभव आहे. आता देखील आपले ५० ते ६० आमदार निवडून येण्यास फारशी अडचण दिसत नसल्याचे पवार म्हणाले.

    वारा कोणत्या दिशेला कसा ओळखता?

    मतदारसंघात कोणाला तिकीट द्यायचे यासाठी कोणती रणनिती वापरली जाते? यावर बोलताना शरद पवार म्हणाले, राज्यातील सर्व जिल्ह्यातील, तालुक्यातील लोकांशी डीप संपर्क असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरून डोळ्यातून मला अंदाज येतो. इतक्या वर्षाच्या अनुभवातून ही गोष्ट कळते. विधानसभा निवडणुकी देखील महाविकास आघाडीला लोकसभे प्रमाणेच यश मिळेल असे सांगितले. त्याच बरोबर या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे वापरल्याचा आरोप त्यांनी केला. याआधी असा वापर झाला नव्हता असे नव्हे. पण आता जेवढ्या प्रमाणात होत आहे ते याआधी कधीच झाले नाही, असे सांगत पवारांनी बारामतीत लोकसभा निवडणुकीत लोकांना पैसे देण्यात आले मात्र त्यांनी मत दिले नसल्याचे सांगितले.

    अजित पवारांनी आपण लोकसभेला जी चूक केली ती चूक कुटुंबातील मोठ्या लोकांनी आता करायला नको होती असे मत व्यक्त केले होते. त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले, मुळात याकडे मी कुटुंब म्हणून पाहात नाही. अजित पवार आणि त्यांचे सर्व सहकारी हे गेल्या १०-१५ वर्षापासून कोणत्या पक्षातून निवडून आले? कोणाविरुद्ध निवडून आले? आमची लढाई भाजपविरुद्ध होती. आम्हाला त्यांची राजकीय विचारसरणी पसंत नाही. त्यांच्याविरोधात आम्हाला मते दिली आणि आता आमच्यातील लोक त्यांच्यात जाऊन बसली. ही लोकांची फसवणूक असल्याचे पवारांनी सांगितले.

    आज आमचा विरोध आहे तो कुटुंब म्हणून नाही. त्यांनी (अजित पवार) हा पक्ष फोडला नसता तर तो त्यांनीच चालवला असता. मी काही त्या ठिकाणी चालवायला बसलो नव्हतो. नेतृत्व आणि अधिकार त्यांचा दिले होते. गेल्या २-३ निवडणुकीत सर्व अधिकार याच लोकांना दिल्याचे पवारांनी सांगितले.

    तर लोक संधीसाधू म्हणतील

    जोपर्यंत विचारधारेशी तडजोड केली जात नाही तोपर्यंत ठीक आहे. पण ज्यांच्याविरोधात लढलो त्यांच्यासोबत जाऊन बसले तर हा व्यक्तीगत विरोध नाही. अशा वेळी विरोध करणे गरजेचे ठरते. हे जर मी महाराष्ट्रात सांगतोय आणि माझ्या घरच्या मतदारसंघात मात्र वेगळा न्याय तर लोक काय म्हणतील? हा संधीसाधूपणा आहे. स्वत:च्या मतदारसंघात नातेवाईक होते म्हणून वेगळी भूमिका आणि इतर ठिकाणी वेगळी भूमिका, असे सांगत पवारांनी अजित पवारांच्या विरोधात उमेदवार का दिला याचे कारण सांगितले.

    जयकृष्ण नायर

    लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed