Uddhav Thackeray Slams Mahayuti: मुख्यमंत्री कोणाचाही असू देत आधी महाराष्ट्रातील लुटारुंना हाकला, हेच ध्येय आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महाविकास आघाडीमधील जागावाटप योग्य झाले आहे का? महायुतीच्या तुलनेत आता महाविकास आघाडीमध्ये तुमच्या वाट्याला कमी जागा आल्या आहेत का?
– एकत्रित निवडणुका लढविल्याने जास्त जागा जिंकण्याची शक्यता असते म्हणूनच युती किंवा आघाडी केली जाते. युती किंवा आघाडीचा हा निश्चितच फायदा असतो. मात्र यामुळे व्यक्तिगत जागा कमी होतात, हा त्याचा दुष्परिणाम असतो. साथीदार जेवढे जास्त तेवढेच जागांचे वाटप अधिक असते. जेव्हा दोन पक्षांमध्ये जागावाटप असते, तेव्हा जास्त जागा मिळतात. आम्ही महायुतीमध्ये होतो, तेव्हा शिवसेना १७१ जागा लढवत होती. आताच्याही त्यांच्या महायुतीमध्ये भाजपने नेहमीप्रमाणे अधिक जागा घेण्याचा चालूपणा केला आहे. यामुळेच आम्ही त्यांना सोडले होते. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपात सुरुवातीला काही जागांसाठी काँग्रसचा तर काही जागांवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा आग्रह होता. मात्र आमच्यात खेचाखेची झाली नाही आणि जागावाटपाचा तिढा सामंजस्याने सुटला.
जागावाटपात कमी जागा मिळाल्याने भविष्यात स्वबळावर निवडणुका लढण्याचा विचार आहे का?
– प्रत्येकाला स्वत:चा पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. अधिकार म्हणण्यापेक्षा ते कर्तव्यच आहे आणि मी माझा पक्ष वाढविण्यासाठी तसा प्रयत्न करणार आहे. भविष्यात असे काही करणार, हे म्हणण्यापेक्षा आपण जे आता काम करीत आहोत ते भविष्यासाठीच आहे. त्यामुळे मी माझ्या परीने पक्ष वाढविण्यासाठी जे योग्य आहे, ते करणार आहे.
लोकसभेत मिळालेले यश तुम्हाला अपेक्षित होते का?
– लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशावर मी समाधानी नाही, आमच्या आणखी काही जागा निवडून यायला हव्या होत्या. काही ठिकाणी आम्ही कमी पडलो. अर्थात मला नंतर जे काही कळले, त्यानुसार काही ठिकाणी पैशांचे बेसुमार वाटप झाल्याचे माझ्या कानावर आले. हे सर्व असले तरी मला आणखी काही जागा अपेक्षित होत्या.
राज्यात महाविकास आघाडीचा सर्वाधिक फायदा हा काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला झाला का?
– असे काहीजण म्हणत आहेत, पण त्याहीपेक्षा मी वेगळ्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधतो. बऱ्याच वर्षांनतर शिवसेनेला नवे चिन्ह अर्थात मशाल घेऊन निवडणूक लढवावी लागली. मला निवडणुकीनंतर असंख्य ठिकाणांहून फोन आले, लोक भेटले. माझ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांशीही अनेकांनी संपर्क साधला. तुम्हालाच मतदान करायचे होते, मात्र चिन्हामुळे आमचा गोंधळ झाला. चुकून आम्ही शिवसेनेच्या जुन्या, अर्थात धनुष्यबाण या चिन्हावर मतदान केल्याचेही त्यांनी सांगितले. वास्तविक हा संभ्रम निर्माण करून शिवसेनेला संपवणे हाच भाजपचा डाव होता आणि आहे. माझ्या पक्षाचे नाव, चिन्ह आणि माझ्या वडिलांचा फोटोही वापरला जात आहेत. आता तर हद्द अशी झाली आहे की, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक पक्षाच्या होर्डिंवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो झळकतोय. तुम्हाला ही गोष्ट मान्य करावीच लागेल. याचा अर्थ असा की महाराष्ट्रात मोदी गॅरंटी चालत नाही तर ठाकरे गॅरंटीच चालते आणि तीही बाळासाहेब ठाकरे यांची.
मुंबईतील ३६ मतदारसंघांच्या तुलनेत दादर-माहीम मतदारसंघाकडे काही विशेष लक्ष आहे का?
– असे काहीही नाही. मुळात मुंबईत माझ्या फारशा सभाच होत नाहीत. राज्यात माझ्या ठिकठिकाणी सभा आहेत. एका दिवशी चार ते पाच सभा होत आहेत. कमी दिवस हातात असल्याने सभांचे सगळे वेळापत्रकच बदलून गेले आहे. पहिली सभा झाल्यानंतर पुढची सभा कुठे आहे, हे मी विचारतो.
प्रथमच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे एकाच वेळेला विधानसभा निवडणूक लढवत आहेत. ठाकरे घराण्यातील एखाद्या व्यक्तीला निवडणुकीत पराभव पत्करावा लागला तर त्याकडे तुम्ही कसे बघाल?
– या निवडणुकीत ठाकरे घराण्यातील कुणाचा पराभव होईल की नाही, यापेक्षा महाराष्ट्र हरता कामा नये. सेनापती बापट जे म्हणाले आहेत, ते मी वारंवार बोलत असतो. जो महाराष्ट्र स्वाभिमानी आहे, ज्याला लुटायचे काम हे लोक करीत आहेत ते थांबायला हवे. आज महाराष्ट्र परावलंबी होत आहे, पराधीन होत आहे. ज्या भारताचा महाराष्ट्र आधार आहे, तो तोडला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र तुटला वा हरला तर राष्ट्र संकटात येणार आहे. ते आम्हाला कदापि होऊ द्यायचे नाही.
शिवसेनेतून फुटलेल्यांना तुम्ही गद्दार म्हणता, मग त्यांना निवडणुकीत हरविण्यासाठी तुमच्याकडून काही वेगळी रणनीती असणार आहे का?
– मी जिथे जिथे जातो तिथे तुफान गर्दी असते. माझ्या चोपड्याच्या सभेलाही तुफान गर्दी होती. गावातील लोक असतात. त्यांना येण्याजाण्यासाठी काही गाड्या नव्हत्या. त्यांना कुणी बिर्याणीही दिलेली नव्हती. तरी लोक तासनतास थांबून होते. चाळीसगावच्या सभेला तर मला सायंकाळचे साडेसहा वाजले होते. मात्र तिथे दुपारी दोन वाजल्यापासूनच गर्दी जमली होती. बरे नुसतीच गर्दी नव्हती, तर जल्लोष होता. त्यामुळे आमच्यापेक्षा लोकांनी, मतदारांनीच तयारी केली असून त्यांनीच आता महाराष्ट्रातील निवडणूक हाती घेतली आहे. त्यामुळे गद्दारांना जनताच धडा शिकवेल.
ज्याचे जास्त आमदार, त्याचा मुख्यमंत्री या शरद पवार यांच्या वक्तव्याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे?
– मला याबद्दलही काही आक्षेप नाही. उलटपक्षी मी सांगेन की शद पवारांच्या जर जास्त जागा आल्या तर त्यांचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री होणार असतील तर तेही त्यांना जाहीर करावे. माझी त्याला काहीच हरकत नाही. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील लुटारूंना हाकला, एवेढच माझे म्हणणे आहे. या लुटारूंना घालविण्यासाठी आपण लढतोय, मुख्यमंत्री कोणाचा व्हावा यासाठी लढत नाही. पवार आणि काँग्रेसने जर नाना पटोले वा विजय वडेट्टीवार यांना मुख्यमंत्री करण्याचे ठरवले असेल तर तेही त्यांनी जाहीर करावे. अर्थात त्यांनी तसे जाहीर करावेच, असाही माझा आग्रह नाही, त्यांना वाटत असेल तर त्यांनी करावे. शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, ते राज्यातील जनताच ठरवेल.
राज्यात २०१९मध्ये काँग्रेस तसेच राष्ट्रवादीसोबत तुमची नवी आघाडी पाहायला मिळाली. आता, २०१४ मध्ये महाराष्ट्राला आणखी काही नवे पाहायला मिळेल का?
– आमची शिवसेना आता महाराष्ट्रद्रोह्यांशी लढतेय. त्यामुळे जे-जे महाराष्ट्रद्रोही आहेत, त्यांच्यासोबत शिवसेना नक्कीच आघाडी वा युती करणार नाही. तसेच जे-जे महाराष्ट्रद्रोह्यांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत करीत आहेत, त्यांच्यासोबतही आम्ही आघाडी करणार नाही.
तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर जास्त टीका करता?
– असे काही नाही, मी मिंध्यांवरही बोलतोय. त्यांच्या भ्रष्टाचाराविषयी मी बोलतोय. ते कसे कंत्राटदारांची भलामण करीत आहेत, नियोजनशून्य काम करून आम्ही विकास कसा करतोय असे रेटत आहेत, त्यावरही मी बोलतोय. या सर्व कंत्रादरांच्या माध्यमातून ते स्वत:चा आणि त्यांच्या मित्रांचा विकास करीत आहेत. ठाण्याची तिजोरी कशी रिकामी झाली? मुंबईची आणि राज्याची तिजोरी कुणासाठी, कशी रिती झाली? मुंबईतील रस्त्यांबाबत जी माहिती मिळाली, ती भयानक आहे. या रस्त्यांसाठी महापालिकेचे ९० हजार कोटी रुपयांची मुदतठेव तोडण्यात आली. ४० हजार कोटी रुपयांपेक्षा कमी मुदतठेव नेता येत नाही, अशाप्रकारचे बंधनच आहे. मात्र आता या मिध्यांनी जवळपास पावणे तीन लाख कोटी रुपयांच्या वर्क ऑर्डर विविध कंत्राटदारांना दिल्या आहेत. हा पैसा त्यांना देणार कुठून? याहीपेक्षा हा पैसा येणार कुठून, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हे सगळे पैसे कंत्राटदारांच्या खिशातून यांच्या खिशात आले आहेत. शिवसेनेचे नाव आणि चिन्ह दिल्याबद्दल मी मोदी-शहांचे आभार मानतो, असे मिध्यांनी जाहीररित्या सांगितले आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड आत्ताच सेवानिवृत्त झाले आहेत. ते कायद्याचे उत्तम निरूपणकार आणि प्रवचनकार आहेत. त्यांना आता बाकीचे काही करण्याची गरज नाही. त्यांनी केवळ देशातील लोकशाही आणि कायदा याबाबत प्रवचन देत फिरण्याचे काम केले तरी त्यांचा नावलौकिक वाढेल.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करीत सरकार आणल्यानंतर तुमच्या पक्षात फूट पडली. आता त्याची भरपाई म्हणून काँग्रेस तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तुम्हाला आघाडीचे सरकार आल्यास मुख्यमंत्रिपद द्यायला हवे का?
– हा प्रश्न तुम्ही मला नाही तर त्यांना विचारायला हवा. मी माझे कर्तव्य करतोय. मी काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घेणार नाही. पण महाराष्ट्रद्रोह्यांविरोधात जे जे माझ्यासोबत आहेत, त्यांना सोबत घेऊन मी लढणार आहे.
एक वडील म्हणून आदित्यची कामगिरी कशी वाटते?
यासाठी मी माझेच पहिले उदाहरण देतो. मला कार्याध्यक्ष म्हणून निवडले गेले, तेव्हाही माझ्याऐवजी एखाद्या ज्येष्ठ नेत्याची माझ्या जागी निवड व्हावी, असे मला वाटत होते. मुलगा म्हणून मी तुला राजकारणात ढकलणार नाही आणि अडवणारही नाही, असे मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब म्हणाले होते. तू आणि शिवसैनिक मिळून हे ठरवा, हे त्यांनी सांगितले होते. मात्र नंतर त्यांनी माझे काम पाहिले. म्हणून त्यांनी शिवाजी पार्कवर माझ्यासाठी आणि आदित्यसाठी भावनिक आवाहन केले होते. बाळासाहेबांना हे माहिती होते की मी त्यांचे विचार माझ्या पद्धतीने पुढे नेतोय. आदित्यही तेच करतोय.
अलिकडेच वैद्यकीय उपचार झाले असतानाही तुम्ही लगेचच निवडणुकांना सामोरे गेलात. त्याविषयी काय सांगाल?
– मी अत्यंत तळमळीने राजकारणात काम करतोय आणि मला ते मनापासून आवडते. मला नवरात्रीपूर्वी थोडा त्रास सुरू झाला होता. मात्र मी डॉक्टरांना सांगितले होते की, मी दसऱ्यापूर्वी तुम्हाला काहीही करू देणार नाही. मग काय व्हायचे ते होईल. त्यानंतर अँन्जोग्राफी झाली, अॅन्जोप्लास्टी झाली नाही. डॉक्टरांना तिथल्या तिथे जे काही करायचे होते ते त्यांनी केले. मी तब्येतीची काळजी करीत नाही. मला काही झालेले नाही असेच मी मानतो. मी माझ्या महाराष्ट्रासाठी लढतोय आणि शेवटी आयुष्य कुणासाठी आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी असलेले जुने संबंध पाहता, त्यांना आता एखादा संदेश द्यायचा झाल्यास काय सांगाल?
– मोदी आणि शहांना मला एवढेच सांगायचे आहे की, ज्यांनी तुम्हाला संकटकाळात मदत केली, त्यांना संपविण्याचा कधीही प्रयत्न करू नका. कारण संकट हे कधी एकटे येत नाही आणि अशावेळी कोणी तरी मित्र असायला हवा. तो मित्रच जर तुम्ही संपविण्याचा प्रयत्न केलात, तर संकटकाळात तुम्हाला वाचविणारा कुणी नसेल.
सुरुवातीला मूळ शिवसेनेत असलेले एकनाथ शिंदे यांचेच उमेदवार आज राज ठाकरे वा तुमच्याविरोधात उभे आहेत, त्याविषयी काय सांगाल?
– आमच्या शत्रूमध्ये फारशी धमकच नाही. अशावेळी कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ एवढेच मी सांगेन. या म्हणीची कथा फार मोठी होईल म्हणून मी आत्ता ती येथे सांगत नाही. मात्र ज्या झाडावर तुम्ही कुऱ्हाड चालवत आहात, त्या कुऱ्हाडीचा दांडा हा त्याच झाडाचाच आहे.