• Thu. Nov 14th, 2024
    आघाडीचे डिपॉझिट गोल करा, संघाच्या भूमीतून योगी आदित्यनाथांचा मविआवर हल्लाबोल

    Yogi Adityanath at Nagpur Rally Highlights from Vidhan Sabha Election: देशहित महत्वाचे नसून केवळ ‘व्होटबँक’ कायम ठेवणे यालाच प्राधान्य. या आघाडीला देशातील जनतेचे हित मान्य नाही, असे म्हणत योगी आदित्यनाथ यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागले.

    महाराष्ट्र टाइम्स

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : महाविकास आघाडी ही राजकीय स्वार्थासाठी तयार झालेली आघाडी आहे. त्यांच्यासाठी देशहित महत्वाचे नसून केवळ ‘व्होटबँक’ कायम ठेवणे यालाच प्राधान्य. या आघाडीला देशातील जनतेचे हित मान्य नाही, त्यांना देशाच्या सुरक्षेशीही काही घेणे देणे नाही. त्यामुळे आघाडीच्या उमेदवारांना निवडून न देता डिपॉझिट जप्त होईल अशा फरकाने महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नागपुरात केली.

    रेशीमबाग येथे भाजपचे मध्य नागपूरचे उमेदवार प्रवीण दटके आणि दक्षिण नागपूरचे उमेदवार मोहन मते यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी भाजपच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन करत योगी आदित्यानाथ यांनी महाविकास आघाडी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्यावर प्रखर टीका केली. महाविकास आघाडीला जनतेशी काहीही घेणे नाही. त्यांच्या एजेंड्यामध्ये शेतकरी नाहीत, महिला भगिनींची सुरक्षा नाही, तरुण नाहीत. आघाडीतील सर्व पक्ष केवळ राजकीय स्वार्थ, व्होट बँकेला कसे आकर्षित करायचे हेच केवळ त्यांना माहिती आहे. त्यामुळे अशांना शासन करायची संधी देऊ नका असे आवाहन योगी यांनी यावेळी केले. यावेळी योगींनी ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ या घोषणेवरून खर्गे इतके का संतप्त होतात? असा सवाल करत निजामाच्या काळात हिंदू एकत्रित नव्हते त्यामुळे हिंदूची हत्या झाली. खर्गेंच्या कुटुंबिय यात भरडले गेले असताना काँग्रेसकडून निजामाच्या अत्याचारावर पांघरुण घालण्यात येत आहे. गणपतीच्या मिरवणूकीत, रामनवमीच्या शोभायात्रेंवर का दगडफेक होते? ही दगडफेक कोणाकडून होते हे सर्वांना माहिती आहे. पण, काँग्रेसने एका विशिष्ट वर्गाची व्होटबँक जपून ठेवण्यासाठी यावर काकाही तोडगा काढला नाही. आता हे सर्व थांबवायचे असेल तर हिंदूनी एकत्रित होण्याची हीच वेळ असल्याचे योगी म्हणाले.

    काँग्रेस अनेक वर्षे सत्तेत असताना देशाला राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा भेडसावत होता. २०१४ पर्यंत देशाच्या सीमावर्ती भागांमध्ये दहशतवाद्यांकडून हल्ले करण्यात येत होते. मात्र, गेल्या दहा वर्षात चित्र बदलले आहे. आता देशाच्या सुरक्षेळा सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे एक नवा भारत बघायला मिळतो आहे. हेच चित्र कायम ठेवायचे असेल तर केवळ राजकीय स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्या काँग्रेसला निवडून देऊ नका. हरयाणामध्ये ज्याप्रमाणे भाजपने हॅटट्रीक साधली तेच महाराष्ट्रात होणे अपेक्षित आहे. केवळ डबल इंजिन सरकारच या प्रदेशाची भूमी, शेतकरी, महिला यांचे संरक्षण व सन्मान करू शकेत. त्यामुळे महायुती सरकारला निवडून द्या असे भावनिक आवाहन योगींनी केले. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रवीण दटके, मोहन मते, शहराध्यक्ष बंटी कुकडे, प्रशांत पवार, माजी आमदार विकास कुंभारे यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed