• Thu. Nov 14th, 2024

    विधानसभा निवडणुकीसाठी ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Nov 12, 2024
    विधानसभा निवडणुकीसाठी ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार – महासंवाद

    मुंबई दि. १२ : केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे.

    नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ४५ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे  असणार आहे. यानंतर जळगावमध्ये ३३, गोंदिया ३२ आणि सोलापूर २९, मुंबई उपनगरमध्ये २६ महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली , हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी प्रत्येकी तीन महिला नियंत्रित मतदान केंद्र असतील.

    महिला नियंत्रित मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वजण महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी महिला नियंत्रित महिला मतदान केंद्र असणार आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर होणार नाही याची काळजी घेण्यात येईल.

    ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालय, पोलीस स्टेशननजीकच्या केंद्रांची तसेच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्राची या विशेष प्रयोगाकरिता निवड करण्यात येणार आहे.

    जिल्हानिहाय महिला नियंत्रित मतदान केंद्र : अहमदनगर १२, अकोला ६, अमरावती ८, औरंगाबाद १३, बीड ८, भंडारा ८, बुलढाणा ७, चंद्रपूर ९, धुळे ५,  जालना ६, कोल्हापूर १०, लातूर ६, मुंबई शहर १२, नागपूर १३, नांदेड ९, नंदुरबार ४,  उस्मानाबाद ४, पालघर ६, परभणी ८, पुणे २१, रायगड ९, रत्नागिरी ६, सांगली ८, सातारा १७,  ठाणे १८, वर्धा ९ आणि यवतमाळ ७ असे असणार आहेत.

    ००००

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed