• Wed. Nov 13th, 2024

    नांदेड येथे मतदार जनजागृतीसाठी एलईडी व्हॅनचा जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते शुभारंभ – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Nov 11, 2024
    नांदेड येथे मतदार जनजागृतीसाठी एलईडी व्हॅनचा जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते शुभारंभ – महासंवाद

    नांदेड, दि. ११: मागच्या निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी कमी मतदान झाले आहे, त्याठिकाणी  एलईडी व्हॅनद्वारे मतदार जनजागृती करण्यात येईल. यामुळे मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. आजपासून केंद्रीय संचार ब्युरो  यांच्यामार्फत नांदेड विधानसभा मतदार संघातील गावामध्ये एलईडी व्हॅनद्वारे मतदार जनजागृती करण्यात येणार आहे. आज या एलईडी व्हॅनला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी परिसरात हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

    यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, केंद्रीय संचार ब्युरोचे सुमीत डोडल आदींची  उपस्थिती होती.

    नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे. सर्व मतदार संघातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे. यासाठी स्वीपअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. मतदारापर्यत पोहोचवून जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय तसेच स्वीपचे नोडल अधिकारी यांच्यामार्फत विविध मतदार जनजागृतीसाठी कार्यक्रम सुरु आहेत.

    मागील निवडणुकीत जेथे मतदान कमी झाले आहे, तेथे हे एलईडी वाहन जाऊन जनजागृती करेल. या वाहनामार्फत दृकश्राव्य माध्यमांचा वापर करुन मतदारांना आवाहन करणारे मतदानाचा संदेश देणे या वाहनाचा उद्देश आहे. या वाहनासोबत जिल्ह्यातील व राज्यातील मान्यवरांचे आवाहानात्मक संदेश प्रसारित होणार आहे. या वाहनाच्या वापरामुळे जिल्ह्यात नक्कीच मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होणार असून, चांगल्या प्रकारे जनजागृती होईल, असे आवाहन  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

    येत्या २० नोव्हेंबरला मतदानासाठी घराबाहेर पडा

    जिल्ह्यात मागील निवडणुकीत जिथे जिथे मतदान कमी झाले आहे, तीथे तीथे ही मतदार जनजागृतीची एलईडी व्हॅन फिरणार आहे. येत्या 20 नोव्हेंबरला लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रात नांदेडला 25 वर्षानंतर या दोन्ही निवडणूक एकत्र होत आहेत. येत्या 20 नोव्हेंबरला जेव्हा मतदार बुथवर जातील तेव्हा त्यांना दोन वेगवेगळे मशिन दिसतील. यावेळेस मतदारांना लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभेसाठी दोन बटन दाबायचे आहे. प्रत्येक नागरिक, युवा-युवतींनी मतदानासाठी घराबाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या प्रमुख मीनल करनवाल यांनी केले आहे.

    मतदार जनजागृतीसाठी एलईडी व्हॅन जाणार या गावात

    मतदार जनजागृतीसाठी केंद्रीय संचार ब्युरो यांच्यामार्फत एलईडी व्हॅन 11 ते 20 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्ह्यातील विविध गावामधून फिरणार आहे. यामध्ये 11 नोव्हेंबर रोजी नांदेड उत्तरच्या जिल्हाधिकारी कार्यालय, शिवाजी चौक, एसपी ऑफीस चौक, शिवाजीनगर, आयटीआय चौक, राज कार्नर, तरोडा नाका, भावसार चौक, अर्धापूर शहरात 3 ते 4 ठिकाणे (अर्धापूर येथे मुक्काम). दि. 12 नोव्हेंबर रोजी हदगाव व किनवट विधानसभा क्षेत्रात लहान फाटा, तामसा गावात 3 ते 4 ठिकाणी, हदगाव येथे 3 ते 4 ठिकाणी, माहूर 3 ते 4 ठिकाणी. (माहूर येथे मुक्काम). दिनांक 13 नोव्हेंबर रोजी हदगाव किनवट मतदार संघात वाई, सारखणी येथे 2 ठिकाणी, किनवट शहरात 4 ते 5 ठिकाणी, बोधडी, इस्लापूर येथे 2 ठिकाणी, हिमायतनगर 3 ते 4 ठिकाणी. दिनांक 14 नोव्हेंबर रोजी भोकर मतदारसंघातील भोकर शहरात 4 ते 5 ठिकाणे, बारड येथे 2 ठिकाणी, मुदखेड येथे 3 ते 4 ठिकाणी तसेच उमरी येथे मुक्काम. दिनांक 15 नोव्हेंबर रोजी उमरी शहर, धर्माबाद शहर, कुंडलवाडी शहर, बिलोली शहर, नायगाव शहर, दिनांक 16 नोव्हेंबर रोजी देगलूर शहर, होट्टल, मरखेल, करडखेड, मुक्रमाबाद,, दिनांक 17 नोव्हेंबर रोजी मुखेड मतदारसंघातील बाऱ्हाळी, मुखेड शहर, कुरुळा, पेठवडज, कंधार मुक्काम, 18 नोव्हेंबर रोजी लोहा मतदार संघातील कंधार शहर, माळाकोळी, लोहा शहर, सोनखेड, 19 नोव्हेंबर रोजी नांदेड दक्षिण मतदारसंघातील कारेगाव, जानापुरी, वाडी पाटी, विष्णुपुरी, हडको नांदेड, सिडको नांदेड, वाजेगाव, देगलूर नाका याठिकाण जाणार आहे. दिनांक 20 नोव्हेंबर रोजी नांदेड दक्षिण उत्तर मतदार संघातील नमस्कार चौक नांदेड, हिंगोली नाका, अण्णाभाऊ साठे चौक, नवीन मोंढा चौक, आनंदनगर, भाग्यनगर, वर्कशाप कॉर्नर नांदेड याठिकाणी जाणार आहे.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed