• Wed. Nov 13th, 2024

    मतदारांच्या सक्रीय सहभागाने मतदानाचा टक्का वाढणार -जिल्हाधिकारी सौरभ कटियार – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Nov 11, 2024
    मतदारांच्या सक्रीय सहभागाने मतदानाचा टक्का वाढणार -जिल्हाधिकारी सौरभ कटियार – महासंवाद

    अमरावती, दि. ११ : स्वीप उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासन, महापालिका आणि विविध संस्था, संघटनांच्या मदतीने आज अमरावती येथे मतदार जनजागृतीसाठी तिरंगा महारॅली काढण्यात आली.

    नेहरू मैदान येथे झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आदी उपस्थित होते.

    उपस्थित मान्यवरांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. राजकमल,  जयस्तंभ, इर्विन चौक मार्गे ही रॅली निघून विभागीय क्रीडा संकुलात समारोप करण्यात आला.

    समारोपावेळी जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले, महारॅलीचे आयोजन उत्कृष्ट प्रकारे झाले आहे. यात सर्व नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली होती. मात्र, शहरी भागात मतदान कमी होत असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचून जागरूकता करणे गरजेचे आहे. त्यांच्यापर्यंत मतदान करण्याचा संदेश पोहोचल्यास मतदानाच्या टक्केवारीत निश्चितच वाढ होणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपले कर्तव्य समजून मतदान करावे, असे आवाहन केले.

    श्री. कलंत्रे यांनी मतदारांमध्ये जनजागृतीसाठी रॅलीचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये विविध घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला आहे.

    कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राथमिक शाळा रहाटगाव आणि प्रगती विद्यालय रहाटगाव यांनी पथनाट्य सादर केले. या पथनाट्यातून मतदान जागृतीचा संदेश देण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांना मतदानाची प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच मतदानासाठी नागरिकांना जागरूक करण्यासाठी मान्यवरांनी हवेत फुगे सोडले.

    विभागीय क्रीडा संकुलात मानवी साखळी करण्यात आली. यातून ‘गो वोट’चा संदेश देण्यात आला. तसेच मनपा शाळेने पथनाट्य सादर करण्यात आले. दिव्यांनी ‘गो वोट’ साकारण्यात आले. शिक्षणाधिकारी श्री. मेश्राम यांनी आभार मानले.

    ०००

     

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed